अंबरनाथ पश्चिमेकडील राज्य महामार्गावर असलेल्या साईबाबा मंदिराशेजारील १४० झोपडय़ांमधील नागरिकांना कारवाईची नोटीस मिळताच या झोपडपट्टीतील एका तरुणाने रविवारी सायंकाळी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. यामुळे संतप्त झोपडीधारकांनी रात्री जाळपोळ करत राज्य महामार्गावर रास्ता रोको केले होते. मात्र, सोमवारी सकाळपासूनच पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत दुपारी उशिरा येथील सर्व अतिक्रमणांवर कारवाई करत हा मार्ग मोकळा केला.
अंबरनाथ पश्चिमेकडे नगरपालिका हद्दीतून जाणाऱ्या जव्हार ते खोपोली राज्य महामार्ग क्रमांक ७६ वर साईबाबा मंदिराला लागून असलेल्या या झोपडय़ा महामार्गाला अडथळा ठरत होत्या. यासाठी पालिकेने झोपडीधारकांना सोमवारी कारवाई करणार असल्याच्या नोटिसाही बजावल्या होत्या. त्या मिळताच येथील नागरिकांनी तात्काळ विरोधास सुरुवात केली होती. त्यातच येथील राजा नामक तरुणाने रविवारी रात्री आठच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे खळबळ माजल्याने परिसरातील नागरिकांना रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर जाळपोळ करत राज्य महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे तासभर या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. अखेर सोमवारी दुपारी उशिरा या परिसरात अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली.