बदलापूर : नागरिकांच्या आरोग्याची काळजी म्हणून नगरपालिकांकडून सातत्याने सार्वजनिक परिसर, गृहसंकुलांमध्ये निर्जंतुकीकरण करण्यासाठी औषध फवारणी केली जाते आहे. मात्र या फवारणीनंतर पालिकेचे कंत्राटी कर्मचारी गृहसंकुलांच्या सदस्यांकडे पैशांची मागणी करत असल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. लाखो रुपयांचे कंत्राट घेणाऱ्या या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांकडून फवारणीच्या नावाखाली अशी लूट सुरू असल्याने संताप व्यक्त होत आहे.

पालिका, आरोग्य व्यवस्था आणि सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींकडून करोनाबाधित रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना विविध प्रकारचे साहाय्य केले जाते आहे. मात्र अशा जागतिक आपत्तीच्या काळातही काही व्यक्तींकडून काळजी घेण्याच्या नावाने आर्थिक लूट सुरू असल्याचे दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वी अंबरनाथमधील एका करोनाबाधित रुग्णाच्या कुटुंबीयांकडे गृहसंकुलाच्या आवारात आणि घरात निर्जंतुकीकरण केल्याचे सांगत फवारणी करणाऱ्या पालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पैशांची मागणी केली होती. संकटाच्या काळात सहकार्य लागत असल्याने कुणालाही दुखवायचे नाही, अशा भावनेतून अनेक नागरिक अशा चहापाण्याच्या मागण्या मान्य करीत होते. मात्र ही मागणी आता प्रथाच बनू लागली आहे.

बदलापूर पश्चिमेतील पाटीलनगर भागात एका रहिवासी संकुलात अशाच प्रकारे निर्जंतुकीकरण करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांनी सोसायटी सदस्यांकडे चहापाण्यासाठी पैशांची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. चांगली फवारणी केली म्हणून चहापाण्यासाठी पैसे द्या, असे सांगत त्या कर्मचाऱ्यांकडून पैशांची मागणी करण्यात आल्याचे सोसायटीच्या अध्यक्षांनी सांगितले. यापूर्वीही त्यांच्याकडून मागणी करण्यात आली होती. त्या वेळी ५० ते १०० रुपये दिले होते. मात्र, प्रत्येक वेळी अशी मागणी होत असल्याने त्यांना पैसे द्यायचे कसे, असा प्रश्न सोसायटी सदस्यांकडून विचारला जात आहे. त्यामुळे असे प्रकार तातडीने रोखण्याची गरज व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे गेल्या महिन्यात याच कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून लाच घेताना कुळगाव बदलापूर नगरपालिकेतील आरोग्य विभागाच्या लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते.

सिटी गार्ड नावाच्या कंपनीला पालिकेने शहरात फवारणीचे कंत्राट दिले असून ४ लाख रुपये महिनाप्रमाणे त्यांना पैसे अदा केले जातात. मात्र असे प्रकार होत असतील तर त्यावर कारवाई केली जाईल. कर्मचाऱ्यांना वेतन देण्याचे काम कंत्राटदाराचे आहे.

 -वैशाली देशमुख, आरोग्य अधिकारी, पालिका

..तर लाखोंची वसुली

एका प्रभागात १०० ते १५० इमारती असतात. अशा प्रत्येक इमारतीतून १०० ते २०० रुपये दिले गेल्यास दिवसाला २० ते ३० हजार रुपयांची वसुली होते. बदलापूरसारख्या शहरात शेकडो इमारतींमधून अशाच पद्धतीने चहापाण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची बेकायदा वसुली होत असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.