दर महिन्याला दोन दुचाकींची चोरी

वसई : वसई-विरार महापालिकेचे दोन कर्मचारी चक्क वाहनचोर निघाले आहेत. गुन्हे शाखा एकच्या पथकाने या टोळीला अटक केली असून या टोळीकडून चोरलेल्या २५ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

वसई-विरार आणि मीरा-भाईंदर शहरात गेल्या काही दिवसांपासून वाहनचोरांनी धुमाकूळ घातला आहे. शहरात दररोज सरासरी तीन वाहने चोरीला जात असतात. या वाहन चोरांच्या वेगवेगळ्या टोळ्या शहरात सक्रिय आहेत. मीरा-भाईंदर व वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा १ च्या पथकाने या प्रकरणी तपास करून तीन जणांच्या एका टोळीला अटक केली.. या टोळीचा सूत्रधार योगेश उर्फ गॅनी मांगेला (३६) हा आहे. त्याच्यासोबत  कल्पक वैती आणि सचिन वैती या दोघांनाही अटक केली आहे. योगेश मांगेला आणि कल्पक वैती हे वसई-विरार महापालिकेत काम

करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली. यापैकी योगेश मांगेला हा औषध फवराणी विभागात तर वैती हा घनकचरा विभागात काम करत असल्याचे सांगितले.

असे कर्मचारी जर आमच्या विभागात काम करत असतील, तर ते तपासावे लागेल, असे महापालिकेच्या स्वच्छता विभागाचे प्रभारी साहाय्यक आयुक्त निलेश जाधव यांनी सांगितले.

बनावट चाव्यांचा किमयागार

या चोरांच्या कार्यपद्धतीबाबत माहिती देताना पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे यांनी सांगितले की, टोळीचा म्होरक्या योगेश मांगेला हा २०१७ पासून दुचाक्या चोरत आहे. आतापर्यंत त्यांच्याकडून चोरलेल्या २५ दुचाक्या हस्तगत करण्यात यश आले आहे. दर महिन्याला दोन दुचाकी चोरण्याचे त्याचे उद्दिष्ट होते. बनावट चाव्या बनवण्यात तो वाक्बगार होता आणि या बनावट चाव्यांच्या माध्यमातून तो रस्त्यलगत उभ्या केलेल्या दुचाक्या सहज सुरू करायचा त्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले.