बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी जाणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांना जुनाट सामग्री घेऊन जावे लागत आहे. बांधकामाच्या ठिकाणी पोहोचल्यावर फक्त घण, पहार, कटावण्या आणि अनेक ठिकाणी ठिगळ लावलेला गॅस कटरचा वापर कामगारांना करावा लागतो. या पारंपरिक पद्धतीच्या जुन्या साहित्याने बेकायदा बांधकाम तात्काळ तोडणे शक्य होत नाही, अशी खंत पाडकाम पथकातील कामगारांनी व्यक्त केली.
स्थानिक रहिवासी पालिकेच्या पथकाला विरोध करतात. पोलीस असले तरी काही माफिया दादागिरीचा प्रयत्न करतात. बेकायदा बांधकामे तोडण्याची सामग्री नवीन असेल तर बांधकामे जमीनदोस्त करताना कोणताही अडथळा येत नाही. झटपट कारवाई करून तेथून निघता येते.
बांधकामे तोडण्यासाठी कामगारांकडे फक्त हातोडा, पहार असते. या साधनांनी बांधकाम तोडण्याची कारवाई अतिशय संथगतीने होते. अडचणीच्या ठिकाणी, गल्लीबोळात जेसीबी जाऊ शकत नाही, तेथे सर्रास हातोडा, घण वापरला जातो. गॅस कटर मुख्यालयात उपलब्ध आहे. गॅस कटरचा पाइप अनेक ठिकाणी ठिगळ लावून बंदिस्त करण्यात आला आहे. काही वेळा गॅस सिलिंडर उपलब्ध नसतो. गॅस भरण्यासाठी प्रभाग अधिकाऱ्याला स्वत:च्या खिशातून पैसे मोजावे लागतात, अशा तक्रारी कर्मचाऱ्यांनी केल्या. तुटपुंज्या, जुनाट साधनांमुळे कारवाई करणे अवघड होत असल्याने, अनेक वेळा भूमाफिया संघटित होऊन पालिकेच्या पथकावर हल्ला करण्याची भीती असते. त्यामुळे घटनास्थळावर कारवाई करून तात्काळ तेथून निघणे आवश्यक असते, पण ते जमत नाही असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

कामगारही भूमाफियांच्या संपर्कात
काही वेळा भूमाफिया काही कामगारांशी संपर्क करून बांधकामांवर हळूहळू घणाचे घाव घाल, असे सांगत कारवाईत बाधा आणतात. घणाचे घाव घालून बांधकाम तोडल्याचा देखावा काही वेळा पथकाकडून केला जातो. पुन्हा भूमाफिया तेच बांधकाम नव्याने आहे त्या ठिकाणी उभे करतो, असेही काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.