योजना कार्यान्वित करण्यासाठी नवीन ठेकेदारांची नेमणूक

वसई : वसई पूर्वेतील ग्रामीण भागात ६९ गावांची पाणी योजनेतून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा करण्यात येणार होता. परंतु त्यात होत असलेल्या दिरंगाईमुळे अखेर पालिकेने यासाठी पुढाकार घेतला आहे. ही योजना कार्यान्वित करण्यासाठी पालिकेने नवीन ठेकेदार नेमून काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.

वसई पूर्वेतील कामण, चिंचोटी, कोल्ही, देवदल, खैरपाडा, बिलालपाडा, पेल्हार ही ग्रामीण भागांतील गावे ही पालिकेच्या क्षेत्रात येत आहेत. परंतु येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने उन्हाळ्याच्या  सुरुवातीपासूनच येथील नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत असते. त्यामुळे पाण्यासाठी येथील नागरिकांना बोअरवेल व विहिरी यावरील पाण्यावर अवलंबून राहावे लागत असून काहींना टँकरचे विकत घ्यावे लागते. तर दुसरीकडे जमिनीत खड्डे मारून त्यातून मिळणाऱ्या पा्ण्यावर आपली तहान भागवावी लागत असल्याचे ग्रामीण भागातील खरे वास्तव आहे.

या गावांना पाणी मिळावे यासाठी ६९ गावांच्या पाणी  योजनेतून या गावांना पाणी दिले जाणार होते, परंतु वर्षानुवर्षे प्राधिकरणाची योजना रखडत असल्याने येथील नागरिकांपर्यंत अजूनही पाणी पोहोचले नाही. या गावांना मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी पालिकेने कंबर कसली आहे. यासाठी पालिकेने नवीन ठेकेदार नेमले असून कामण, देवदल, चिंचोटी, पेल्हार, कोल्ही, खैरपाडा, बिलालपाडा या ठिकाणी १००, १५०, २०० मि.मी. लांबीच्या व्यासनिहाय जलवाहिन्या अंथरून येथील पाणीपुरवठा कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.

या जलवाहिन्या खरेदी करण्यासंदर्भात पालिकेने मेसर्स जिंदाल सो. लि. यांना कार्यादेश देण्यात आले असून ही पूर्ण जलवाहिनी अंथरण्यासाठी पॅनलवरील मंजूर ठेकेदारांना याबाबत सूचना केल्या आहेत. येत्या जानेवारी २०२१ पर्यंत हे काम पूर्ण केले जाणार असल्याचे पालिकेने सांगितले आहे.

सध्या एक दिवसाआड पाणी

वसई पूर्वेतील गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने टप्प्याटप्प्याने प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या पेल्हार पाणी योजनेतून बापाणे येथे वितरण व्यवस्थेतून तर तबेलापाडा, कोल्ही येथील खुताडीपाडा, कामडीपाडा, पाळणापाडा यांना एक स्टॅण्ड पोस्टवर एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. तर पुढील भागात आधी टाकलेल्या जलवाहिन्या तपासण्याचे काम तसेच ज्या ठिकाणी जलवाहिन्यांना गळती आहे तिथे दुरुस्ती अशी कामे सुरू आहेत.