24 October 2020

News Flash

कचरा विल्हेवाटीची पुन्हा सक्ती

पालिकेने पुन्हा एकदा कचरा विल्हेवाटीची सक्ती राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाणे शहरातील गृहसंकुलांसह आस्थापनांना पालिकेच्या नोटिसा

दररोज शंभर किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण होणारी गृहसंकुले तसेच आस्थापनांसाठी ठाणे महापालिकेने पुन्हा एकदा कचऱ्याची जागच्या जागी विल्हेवाट लावण्याची सक्ती केली आहे. पालिकेने शहरातील चारशेहून अधिक गृहसंकुलांना या संदर्भात नोटिसा बजावल्या आहेत. तसेच कचरा उघडय़ावर टाकला किंवा जाळल्यास संबंधित व्यक्तीकडून शंभर ते दोनशे रुपये दंड ठोठावण्याचा इशारा दिला आहे. याखेरीज बांधकाम कचरा कुठेही टाकल्यास पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील पाच हजार चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या आणि दररोज शंभर किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या गृहसंकुले, मॉल आणि आस्थापनांना आपल्या आवारातच कचऱ्याची विल्हेवाट लावणे पालिकेने बंधनकारक केले होते. यासाठी वर्षभरापूर्वी सर्वसंबंधितांना नोटिसाही बजावण्यात आल्या होत्या. मात्र, याला गृहसंकुलांतील रहिवाशांसह व्यापारी वर्गातूनही विरोध करण्यात आला. त्यानंतर राजकीय दबाव टाकण्यात आल्याने पालिकेने या निर्णयाच्या अंमलबजावणीत दोनदा मुदतवाढ दिली. ही मुदत काही महिन्यांपूर्वीच संपली. मात्र, त्यानंतरही कचरा विल्हेवाटीबाबत कोणताच निर्णय झाला नव्हता. असे असतानाच पालिकेने पुन्हा एकदा कचरा विल्हेवाटीची सक्ती राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

पालिकेने शहरातील चारशे गृहसंकुले आणि आस्थापनांना पाठवलेल्या नोटिशीमध्ये ओल्या कचऱ्यावर परिसरातच प्रक्रिया करण्याची सूचना केली आहे. या नोटिसांमुळे गृहसंकुलांतील रहिवासी पुन्हा आक्रमक होण्याची आणि शहरात कचरा विल्हेवाटीच्या मुद्दय़ावरून नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या घनकचरा विभागाचे सहायक आयुक्त शंकर पाटोळे यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे.

दंड आकारणी

शहरातील मोठी गृहसंकुले आणि आस्थापनांना कचरा विल्हेवाटसक्ती करण्याबरोबरच घनकचरा नियमावलीच्या अंमलबजावणीसाठी दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णयही प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार कचऱ्याचे वर्गीकरण आणि वेगवेगळ्या डब्यात कचरा साठविला नाही तर सुरुवातीला शंभर रुपये आणि त्यानंतर पाचशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तसेच कचरा उघडय़ावर जाळला तर शंभर रुपये, कचरा इतरत्र टाकला तर दोनशे रुपये, उघडय़ावर थुंकल्यास शंभर रुपये आणि बांधकाम कचरा इतरत्र टाकला तर पाच हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2019 1:27 am

Web Title: municipal notices to establishments with thane city homes akp 94
Next Stories
1 दिव्यातील पुलासाठी २३ इमारतींवर हातोडा
2 बदलत्या वित्तस्थितीत आर्थिक नियोजन कसे?
3 येऊरमधील पर्यटक संख्येत घट
Just Now!
X