ठाणे : महापालिकेचे पार्किंग प्लाझा करोना रुग्णालय प्राणवायू पुरवठा झाल्यामुळे दोन दिवसांत सुरू होण्याची चिन्हे असतानाच, दुसरीकडे शहरातील खासगी करोना आणि बिगर करोना रुग्णालयांनाही प्राणवायूचा नियमित पुरवठा होऊ लागला आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयातील प्राणवायूची तूर्तास तरी चिंता मिटली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये १४ हजार ५३९ सक्रिय रुग्ण आहेत.  शहरात पालिका आणि खासगी अशी ४१ करोना रुग्णालये आहेत. या रुग्णालयांमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्राणवायूचा तुटवडा जाणवत आहे. महापालिकांच्या रुग्णालयांचा प्राणवायूचा पुरवठा सुरळीत झाला असला तरी खासगी करोना रुग्णालयांमध्ये तुटवडा कायम होता. तसेच शहरामध्ये २५० खासगी रुग्णालये आहेत. त्यापैकी बिगर करोना रुग्णालयांमध्येही प्राणवायूचा तुटवडा जाणवत होता. करोना चाचणीचा अहवाल येण्यासाठी तीन ते चार दिवस लागत असून तोपर्यंत अनेकजण बिगर करोना रुग्णालयात उपचारासाठी दाखल होतात. अशा करोना संशयित रुग्णांनाही प्राणवायूची गरज लागत असून यामुळे प्राणवायूची मागणी वाढल्याने त्याचा तुटवडा निर्माण झाला आहे.

खासगी रुग्णालयांना दररोज ६८ मेट्रिक टन प्राणवायूची गरज भासत असून या संदर्भात इंडियन

मेडिकल असोसिएशनचे ठाणे अध्यक्ष डॉ. संतोष कदम यांनी जिल्हा प्रशासनाची भेटही घेतली होती. त्यानंतरही पुरवठा सुरळीत झाला नव्हता. दरम्यान, या रुग्णालयांचा प्राणवायू पुरवठा पुन्हा सुरळीत झाला असून शहरासाठी ही दिलासादायक बाब आहे.

पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे खासगी रुग्णालयांना लागणाऱ्या प्राणवायूची समस्या तूर्तास मार्गी लागली आहे. प्राणवायूचा नियमित पुरेसा साठा रुग्णालयांना मिळत आहे. असे असले तरी वाढत्या रुग्णसंख्येमुळे जास्तीचा प्राणवायू लागू शकतो. त्यामुळे वाढीव साठा उपलब्ध होणे गरजेचे आहे. -डॉ. संतोष कदम अध्यक्ष, आयएमए, ठाणे