धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल; विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम

शाळांची मैदाने विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी, कवायती करण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांना उपयुक्त असलेले शाळेचे कार्यक्रम भरविण्यासाठी असतात. पण मीरा-भाईंदर महापालिकेच्या नवघर शाळेच्या मैदानात शाळाबाह्य कार्यक्रमच अधिक होत असल्याचे चित्र आहे. या शाळेच ेस्वत:चे मैदान असूनही त्याचा विद्यार्थ्यांना उपयोग होत नाही. तिथे विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचीच रेलचेल असते. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही होत आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी अभ्यासासोबतच मैदानी खेळही आवश्यकआहे. यासाठी नवघर शाळेला मैदानाची सुविधा आधीपासूनच उपलब्ध आहे. मात्र या मैदानाचा विद्यार्थ्यांना उपयोग करून न देण्याचेच महापालिका प्रशासनाने ठरविले आहे. प्रभाग अधिकाऱ्यांकडून विविध उत्सव व कार्यक्रमांना शाळेचे मैदान भाडय़ाने दिले जात आहे. सध्या हे मैदान अशाच पद्धतीने एका धार्मिक उत्सवासाठी दिले गेले आहे. शाळा सुरू असतानाच या उत्सवात सुरू असलेल्या ध्वनिक्षेपकाच्या आवाजाने विद्यार्थ्यांच्या दैनंदिन अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे अवघड होत आहे. शाळेच्या आसपास ध्वनिप्रदूषण केले जाऊ नये, असा नियम आहे, मात्र ते पायदळी तुडवले जात आहेत. त्याचा शाळेच्या पटसंख्येवर परिणाम होत आहे. उत्सव अथवा धार्मिक सणांना ग्रामस्थांचा विरोध नाही. मात्र महापालिकेने त्यासाठी अन्य जागा उपलब्ध करून द्यावी.

जयंत पाटील, ग्रामस्थ.

शाळेच्या वेळात कोणत्याही कार्यक्रमाला परवानगी दिली असल्यास ते चुकीचे आहे. यापुढे अशी परवानगी न देण्याचे आदेश संबंधितांना देण्यात येतील.

अच्युत हांगे, आयुक्त.