पालिकेच्या स्थायी समितीत गौप्यस्फोट

ठाणे : महापालिका क्षेत्रामध्ये लस तुटवड्यामुळे लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागत असतानाच, दुसरीकडे घोडबंदर येथील आनंदनगरमधील लसीकरण केंद्रावरून शंभर लशींचा साठा गायब झाल्याची धक्कादायक बाब गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत उघडकीस आली. लशींचा काळाबाजार तर होत नाही ना, अशी शंका नगरसेवकांनी व्यक्त केली असून या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये ५५ हून अधिक लसीकरण केंद्रे आहेत. परंतु लशीचा पुरेसा साठा उपलब्ध होत नाही, त्यामुळे अनेक केंद्रे बंद ठेवण्यात येतात. काही वेळेस लस तुटवड्यामुळे सर्वच केंद्रे बंद ठेवण्यात येतात. शहरातील नागरिकही लस घेण्यासाठी केंद्रांबाहेर पहाटेपासूनच रांगा लावतात. असे असतानाच घोडबंदर येथील आनंदनगर भागातील लसीकरण केंद्रावरून लशीचा साठा गायब झाल्याची बाब शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक नरेश मणेरा यांनी गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत उघडकीस आणली. या केंद्रावर दोनशे लस उपलब्ध झाल्या होत्या. मात्र, येथील डॉक्टरांनी केवळ शंभर नागरिकांना टोकन देऊन त्यांनाच लस दिली. त्यामुळे उर्वरित शंभर लशींच्या साठ्याबाबत डॉक्टरांकडे विचारणा केली असता, हा साठा दोन नगरसेवक घेऊन गेले असल्याचे त्यांनी सांगितले. तर, संबंधित नगरसेवकांनी मात्र त्याबाबत इन्कार केला आहे. त्यामुळे डॉक्टरांनी दिलेली माहिती खोटी असल्याचे उघड झाले. या डॉक्टरांना पुन्हा विचारले असता, त्यांनी १५० नागरिकांचे लसीकरण केल्याचे उत्तर दिले. पण, उर्वरित ५० लशींच्या साठ्याचे उत्तर दिलेच नाही, अशी माहिती नगरसेवक मणेरा यांनी सभागृहात दिली. तसेच या केंद्रांवर लशीचा काळाबाजार तर होत नाही ना, अशी शंका व्यक्त करत नगरसेवकांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी बैठक संपल्यानंतर या दोन्ही डॉक्टरांना त्यांच्या दालनात बोलावण्याचे आदेश दिले. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.