19 November 2019

News Flash

तक्रारींकडे पालिकेचे दुर्लक्ष

जितेश अपार्टमेंट  भाईंदर पूर्वेला असलेली जितेश अपार्टमेंट ही इमारत मुख्य रस्त्यालाच लागून आहे.

समस्या संकुलांच्या  : मयूर ठाकूर

जितेश अपार्टमेंट  भाईंदर पूर्वेला असलेली जितेश अपार्टमेंट ही इमारत मुख्य रस्त्यालाच लागून आहे. भाईंदरमधील ही एक जुनी सोसायटी असली तरी या सोसायटीच्या अनेक समस्या आहेत.

जितेश अपार्टमेंट सोसायटीसमोरील रस्त्यावर खड्डे, दरुगधी, वायुप्रदूषण आणि ध्वनिप्रदूषण अशा मोठय़ा समस्या असून याबाबत वारंवार तक्रार करूनही कार्यवाही होत नसल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत. तसेच या ठिकाणी महापालिकेकडून आजपर्यंत कुठल्याही प्रकारची रोगप्रतिबंधक फवारणी करण्यात न आल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.

जितेश अपार्टमेंट या एकाच इमारतीत वेगवेगळे पाख (विंग) आहेत. सोसायटीतील रहिवाशांची संख्या अडीचशेच्या घरात आहे. सोसायटी बरीच वर्षे जुनी असल्याने इथल्या समस्यात भर पडत चालली आहे.

इमारती बाहेर प्रचंड खड्डे

जितेश अपार्टमेंट ही इमारत भाईंदर पूर्व परिसरातील मुख्य रस्त्यालगतच आहे. त्यामुळे सोसायटीत मोकळी जागा नसल्यामुळे इमारतीची सुरुवात मुख्य रस्त्यापासूनच होते. इमारती समोरच मुख्य रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात खड्डय़ाचे साम्राज्य निर्माण झाले असल्यामुळे रहिवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असल्यामुळे अनेक वेळा गंभीर दुर्घटना घडत असल्याच्या येथील रहिवाशांच्या तक्रारी आहेत.

 कचराकुंडीची सुविधा असूनही अस्वच्छता

महानगरपालिकेने या सोसायटीला कचऱ्याचे डबे दिले असले तरी वेळोवेळी ते उचलले जात नसल्याने नागरिकांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात हा कचरा भिजत असल्याने सोसायटीमध्ये दरुगधी पसरत आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही आजवर त्यावर तोडगा निघालेला नाही.

वाहनतळाची असुविधा जितेश अपार्टमेंट सोसायटी परिसरात चारचाकी वाहने उभे करण्याची कुठलीच सोय उपलब्ध नाही. शिवाय सोसायटीबाहेरील रस्ता अरुंद असून त्यावर वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे इमारतीबाहेर वाहन उभे करण्यास जागाच शिल्लक राहात नाही. केवळ जागा नसल्याने रहिवाशांना वाहन घेणे शक्य होत नाही. शिवाय सततच्या वाहनांच्या वर्दळीमुळे रहिवाशांना ध्वनिप्रदूषणाचाही त्रास सहन करावा लागत आहे.

परिसरात धुळीचे वातावरण

जितेश अपार्टमेंट परिसरात विमल डेरी ते इंद्रलोक रस्त्यावर पदपथाचे काम करण्यात येत आहे. परंतु काम अतिशय संथगतीने होत असल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून धुळीचे साम्राज्य पसरलेले आहे. या धुळीच्या त्रासाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

सोसायटीला भेडसावणाऱ्या समस्यांकडे पालिकेकडून लक्ष दिले जावे हीच अपेक्षा रहिवासी करत आहेत.

– अनिल चिकणे, स्थानिक रहिवासी

First Published on November 7, 2019 2:13 am

Web Title: municipalities ignore complaints akp 94
Just Now!
X