२४ कुटुंबांना बाहेर काढले

पालिका हद्दीतील २७ गावांमधील गोळवली येथील सात मजली ‘मिहिर हाइट्स’ या बेकायदा इमारतीवर अतिक्रमण नियंत्रण विभाग आणि ‘आय’ प्रभागाने तोडकामाची कारवाई सुरू केली आहे. इमारतीतील २४ कुटुंबांना बाहेर काढण्यात आले आहे. शुक्रवारी दिवसभरात इमारत जमीनदोस्त करण्यात येईल, असे ‘आय’ प्रभागाचे प्रभाग अधिकारी शरद पाटील यांनी सांगितले.

गोळवलीत डॉ. सुरेखा भालेराव यांची वडिलोपार्जित जमीन आहे. या जमिनीवर मे. प्रजापती कन्स्ट्रक्शनचे कन्हैयालाल प्रजापती, नागेश सामंत या विकासकांनी भालेराव यांची कोणतीही परवानगी न घेता इमारत उभी केली.

या बांधकामाला पालिका अधिकाऱ्यांनी साथ दिली, असा आरोप आहे. डॉ. भालेराव दोन वर्षे मालकी हक्काच्या जमिनीवर इमारत जमीनदोस्त करावी म्हणून पालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, ई प्रभाग, मानपाडा पोलीस, नगररचना विभाग यांच्याकडे प्रयत्न करीत होत्या.

पालिका, पोलिसांकडून सहकार्य मिळत नाही म्हणून डॉ. भालेराव यांनी मुंबई उच्च न्यायालयात विकासक, नगररचना अधिकारी यांच्या विरुद्ध याचिका दाखल केली होती. न्या. नरेश पाटील, न्या. जी. एस. कुलकर्णी यांनी दोन्ही बाजू ऐकून विकासकांनी भालेराव यांच्या जमिनीवर बेकायदा बांधकाम केले असल्याचा निष्कर्ष काढून १५ दिवसांत प्रजापती कन्स्ट्रक्शनने उभी केलेली बेकायदा इमारत जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले होते.

महिनाभर ही इमारत तोडण्यास पालिकेकडून टाळाटाळ करण्यात येत होती. अतिक्रमण नियंत्रण विभागाचे प्रमुख म्हणून सुनील जोशी यांनी पदभार घेताच, प्रभाग अधिकाऱ्यांना न्यायालयाची अवमान कारवाई टाळण्यासाठी गोळवलीतील बेकायदा इमारत जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे गुरुवारपासून प्रभाग अधिकारी शरद पाटील यांच्या पुढाकाराने ही इमारत जमीनदोस्त करण्याची कारवाई सुरू करण्यात आली.