पालिका म्हणते, उंदरांच्या नियंत्रणासाठी कुठलीच योजना नाही

भाईंदर : मीरा रोड पूर्वेच्या शांती पार्क परिसरातील रहिवासी सध्या उंदीर आणि घुशी यांच्या समस्यांमुळे त्रस्त आहेत. उंदरांमुळे अन्नधान्य आणि वस्तूंची नासधूस होत असल्याने याच्या तक्रारी मीरा-भाईंदर महपालिकेकडे करण्यात आल्या आहेत. मात्र उंदरांवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेकडे कोणतीही योजना नसल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.

मीरा रोड पूर्व भागात शांती पार्क परिसर आहे. या परिसरातील नागरिक उदंरांच्या उपद्रवामुळे त्रस्त झाले असल्याचे समोर आले आहे. या परिसरात असलेल्या इमारतींच्या  मोकळ्या जागेत उंदीर आणि घुशींनी सर्वत्र पोखरून ठेवले आहे. सोसायटी आवारामध्ये उभ्या वाहनांची वायर कुरतडण्याचे प्रकार नियमित घडत असून अनेकांच्या कार्यालयातील संगणक व इतर साहित्याची नासधूस होत आहे. या उदंरांचा बंदोबस्त न केल्यास मोठे नुकसान होण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली.

शहरात नुकतीच रस्त्यांची कामे करण्यात आली. त्यामुळे जमिनीखाली वावरणारे उंदीर-घुशी बाहेर आल्याचे स्थानिकांनी सांगितले. रस्त्याच्या कडेला टाकलेला अन्नपदार्थाचा कचरा उंदरांच्या वाढीला पोषक ठरत आहे. मात्र महापालिकेकडून औषध फवारणी केली जात नाही. घुशी आणि उदरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणतीही उपाययोजना आखली नसल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.

मीरा-भाईंदर महापालिकेकडून आतापर्यंत उंदीर आणि घुशी यांच्या नियंत्रणासाठी कोणतीही योजना आखलेली नाही. -डॉ. संभाजी पानपट्टे, उपायुक्त, आरोग्य विभाग