बदलापूर नगरपालिकेने अवैध बांधकामांबाबत धडक मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला असून पालिकेने भर रस्त्यात असलेले सहा मासळीवाले व आठ भाजीवाल्यांचे गाळे पाडण्यात आले आहेत.

बदलापूर पूर्वेला उड्डाणपुलाखाली मटणवाल्यांनी व त्यांच्यासमोरील एका रस्त्यावर भाजी व मच्छीवाल्यांनी गाळे बांधले होते. त्यातील मासळी व भाजी विक्रेत्यांनी वाहने जाण्या-येण्याचा रस्ता पूर्णत: अडवून आपला व्यवसाय बिनधोक सुरू ठेवला होता. त्यातील मासळी विक्रेत्यांसाठी शासकीय अनुदानातून बदलापूर पूर्वेलाच एक मजली मासळी मार्केट पालिकेने बांधून पूर्ण केले होते. यात मच्छी विक्रेत्यांना हक्काचे गाळे सर्व सोयींनी उपलब्ध आहेत. मात्र, येथील गाळे ताब्यात घेऊनही या विक्रेत्यांनी रस्ता अडवून आपला व्यवसाय उड्डाण पुलाखाली सुरूच ठेवला होता. मासळी विक्रेत्यांचा व्यवसाय होत असल्याचे पाहून येथे काही भाजी विक्रेत्यांनीही बस्तान मांडले होते. त्यामुळे येथील वाहतुकीचा रस्ता बंद झाला होता. अखेर पालिकेने दोन दिवसांपूर्वी हे गाळे पाडण्याचा निर्णय घेतला. नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या उपस्थितीत पोलीस संरक्षणात जेसीबीच्या साहाय्याने पाडण्यात आले आहेत. तसेच, येथील रस्ताही वाहतूकीसाठी पूर्ववत करण्यात येणार असून या रस्त्याला लागूनच असलेल्या पालिकेच्या दुचाकी वाहनतळाचा मार्गही मोकळा झाला आहे.

दरम्यान, येथे उड्डाणपुलाच्या थेट खाली असलेले चिकन-मटण विक्रेत्यांसाठी पालिका वेगळ्या जागेच्या शोधात असून लवकरच मटण विक्रेत्यांनाही तेथे हलविण्यात येणार आहे.