ग्रंथसंपदेच्या आडून बेकायदा बंगला वाचवण्याचा प्रयत्न फसला

सुमारे अडीच हजारांहून अधिक पुस्तके.. त्यातही काही दुर्मीळ ग्रंथांचा खजिना.. बुलडोझर घेऊन महापालिकेचे पथक येऊरची टेकडी चढते आहे हे लक्षात येताच बंगला वाचविण्यासाठी साहित्य वर्तुळात ‘पाटीलकी’ गाजविणाऱ्या एका बडय़ा अधिकाऱ्याने साहित्यसंपदेची ढाल पुढे करण्याचा प्रयत्न सुरू केला. दुर्मीळ साहित्याचे स्थलांतर करण्यासाठी काही दिवसांची तरी मुदत द्या, असे आर्जव सुरू झाले. अतिक्रमणविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांना काही लेखकांचे दूरध्वनीही सुरू झाले. साक्षात सरस्वतीच्या उपासकाच्या बंगल्यावर बुलडोझर चढविण्याचे पातक करू नका, असा सल्लावजा इशाराही दिला गेला. पण ग्रंथसंपदेच्या आडून बंगला वाचवण्याचा प्रयत्न हाणून पाडत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दोन-अडीच हजार पुस्तकांची ग्रंथसंपदा गोण्यांमध्ये भरून बाहेर काढत बंगल्याचे ‘पानिपत’ केले.

येऊरच्या टेकडीवर आदिवासी तसेच मूळ भूमिपुत्र असलेल्या स्थानिकांच्या जमिनी मोठय़ा प्रमाणावर आहेत. या जमिनी बळकावत, खरेदी करत धनदांडग्यांनी या भागात आलिशान बंगले उभारले आहेत. ठाण्यातील बडय़ा राजकीय नेत्यांच्या बंगल्याची मोठी आरास येथे दिसून येते. या राजकारणापुढे नतमस्तक होऊन काही साहित्यिक, अधिकारी, उद्योजकांनीही या भागांतील मोक्याच्या जागा पदरात पाडून घेतल्या आहेत. याविषयी येऊरमधील काही स्थानिक रहिवाशांनी गेल्या काही वर्षांपासून येथील चार ते पाच बंगल्यांविषयी तक्रारी केल्या होत्या. मात्र त्याकडे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आजवर फारसे लक्ष दिले नव्हते. ठाण्याचे सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांच्याकडे या तक्रारी पोहोचल्या तेव्हा त्यांनी विद्यमान महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना या प्रकरणात जातीने लक्ष घालण्याची विनंती केली होती.

जयस्वाल यांनीही या बंगल्यांची फाइल तपासून घेतली आणि कारवाईची तयारी केली. मात्र गेल्या आठ महिन्यांत जयस्वाल यांचेही पाऊल येऊरच्या दिशेने पडत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. अखेर मंगळवारी सुट्टीवर जाताना येऊरच्या बंगल्यांवर कारवाईचे सक्त आदेश जयस्वाल यांनी अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अशोक बुरपुले आणि अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांना दिले. राज्य सरकारमध्ये वरिष्ठ पद भूषविलेल्या आणि साहित्य विश्वात पाटीलकी गाजवत फिरणाऱ्या एका बडय़ा साहित्यिकास या कारवाईचा अंदाज येताच त्याने बंगल्यातील ग्रंथसंपदेचा हवाला देण्यास सुरुवात केली. अडीच हजार पुस्तके एका दिवसात कशी हलवायची, असा सवाल करण्यात आला. अतिक्रमणविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांना काही बडय़ा साहित्यिकांचे, कलावंतांचे फोन येऊ लागले. मात्र जयस्वाल यांच्या आदेशाची अंमलबजावणी करत पुस्तके मोठय़ा गोण्यांमध्ये भरून बाहेर काढण्यात आली आणि बंगल्यांवर बुलडोझर चालविण्यात आला.