X

झऱ्याचे पाणी नळाद्वारे थेट प्राचीन लेण्यात

सोनावळे गावापासून साडेतीन किमी अंतरावर डोंगरात ही लेणी आहेत.

मुरबाडच्या ‘गणेश गडद’ पर्यटनस्थळाला संजीवनी

सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील मुरबाड तालुक्यातील सोनावळे गावाजवळील प्राचीन गणेश लेणी अथवा गणेश गडद या अतिशय वैशिष्टय़पूर्ण गुहा तेथील असुविधांमुळे दुर्लक्षित होत्या. मात्र आता वनविभाग आणि सोनावळे ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने थेट लेण्यांमध्ये चक्क नळपाणी योजना राबविण्यात आल्याने या पर्यटनस्थळाचा जीर्णोद्धार झाला आहे. त्याचबरोबर तीन सौर पथदिवे बसवून इथल्या दालनांमध्ये रात्री मुक्काम करू इच्छिणाऱ्यांसाठी उजेडाची सोय केली आहे.

सोनावळे गावापासून साडेतीन किमी अंतरावर डोंगरात ही लेणी आहेत. वाटेत घनदाट जंगल असून ते जैवविविधतेने समृद्ध आहे. त्यामुळे गावापासून लेण्यांपर्यंतच्या प्रवासात आढळणाऱ्या निसर्ग श्रीमंतीची ओळख करून देण्यासाठी स्थानिक मासोनावळे गावापासून साडेतीन किमी अंतरावर डोंगरात ही लेणी आहेत. र्गदर्शक नेमण्यात येणार आहेत. त्याचबरोबर पर्यटकांना त्यांच्या मागणीनुसार ग्रामस्थांच्या वतीने शाकाहारी भोजन व्यवस्था पुरवली जाणार आहे. यापूर्वी याच डोंगररागांमध्ये असलेल्या नागझरी या बारमाही झऱ्यावर पाणीपुरवठा योजना राबवून खालच्या बाजूला असलेल्या आदिवासी पाडय़ांना पाणी पुरवण्यात येत आहे. मात्र लेण्यांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचा हा बहुधा देशातील पहिलाच प्रकल्प आहे.

सातव्या शतकात खोदलेल्या या भव्य लेण्यांद्वारे तत्कालीन संस्कृतीची ओळख होण्यास मोठा हातभार लागला. १८७० मध्ये भगवानलाल इंद्रजी यांनी या लेण्यांची नोंद घेतली. गणेश लेणी नावाने ओळखल्या जाणाऱ्या या दगडी गुहेत विविध दालने असून त्यात हिंदू देवदेवतांची शिल्पे कोरण्यात आली आहेत. मध्यभागी मुख्य सभागृह आणि शेजारी छोटी तीन-चार दालने असे या लेण्यांचे स्वरूप आहे. पावसाळ्यात लेण्यांच्या वरच्या भागावरून कोसळणारा धबधबा पर्यटकांना आकर्षित करतो. मात्र पावसाळ्यानंतर इथे पाण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. त्यामुळे पर्यटकांची गैरसोय होत होती. आता ती चिंता मिटली आहे.

लेण्याजवळच असलेल्या ‘आंब्याचे पाणी’ या बारमाही झऱ्यावरून थेट वाहिन्यांद्वारे पाणी लेण्यात आणले आहे. ग्रामस्थांनी गेल्या पंधरा दिवसात प्रयत्नांची शर्थ करून जवळपास एक किलोमीटर लांबीची वाहिनी टाकून झऱ्याचे पाणी लेण्यांजवळील टाकीत आणले आहे. गुरुत्वीय बलाने हे पाणी लेण्यात आले आहे. मंगळवारी, वनक्षेत्रपाल तुकाराम हिरवे, इतिहासतज्ज्ञ अविनाश हरड आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत या

पाणी योजनेचे औपचारिक

उद्घाटन झाले. या ठिकाणी रात्री सौरदिव्यांचा प्रकाशही असेल. त्यामुळे पर्यटकांना इथे मुक्काम करता येणे सोयीचे होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.

ग्रामस्थ आणि वन विभागाच्या वतीने लेण्यांकडे जाणारी पायवाट दुरुस्त करण्यात येत आहे. कठीण चढ काढून टाकण्यात येत आहे. त्यामुळे पर्यटकांना इथे अधिक सुलभ पद्धतीने येता येईल. मुख्य वनसंरक्षक आणि उपवनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांच्या सहभागातून हा प्रकल्प साकारला जात आहे.

तुकाराम हिरवे, वनक्षेत्रपाल, टोकावडे

आपल्या प्राचीन परंपरा आणि संस्कृती समजून घेण्यासाठी लेण्यांचा अभ्यास उपयुक्त ठरतो. पाणी, वीज, सोपे रस्ते या सोयींमुळे आता ‘गणेश लेणी’ परिसरात अधिक संख्येने पर्यटक येतील. वाटेत जैवविविधतेने श्रीमंत असे जंगल आहे. त्यामुळे पर्यटकांना ही भेट संस्मरणीय होईलच, शिवाय त्यातून सोनावळे ग्रामस्थांनाही रोजगाराच्या संधी मिळतील.

*अविनाश हरड, अश्वमेध प्रतिष्ठान

First Published on: October 5, 2017 3:56 am
वाचा / प्रतिक्रिया द्या
Outbrain