नरभक्षक बिबटय़ाचे मूळ स्थान शोधण्याचा प्रयत्न

दोन वृद्ध व्यक्तींना आपली शिकार करून मुरबाड परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबटय़ाला ठार करण्यात आल्यानंतर स्थानिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी, वनविभाग मात्र या बिबटय़ाचे मूळ शोधण्याच्या कामाला लागले आहे. नरभक्षक ठरवून ठार करण्यात आलेला बिबटय़ा जुन्नरच्या जंगलात काही महिन्यांपूर्वी पकडण्यात आलेला बिबटय़ा होता का याचा तपास वन अभ्यासकांकडून केला जात आहे. गेल्या दोन वर्षांत जुन्नरच्या जंगल परिसरातून सातपेक्षा अधिक बिबटे जेरबंद करण्यात आले होते. या बिबटय़ांना भीमाशंकर आणि मुरबाड परिसरातील जंगलामध्ये सोडण्यात आले होते. त्यापैकीच हा एक बिबटय़ा असण्याची शक्यता वन अभ्यासकाकडून व्यक्त केली जाऊ लागली आहे.

इतक्या वर्षांपासून या भागातील नागरी वस्त्यांमध्ये बिबटय़ाचा वावर नसताना अचानक आलेल्या या बिबटय़ामुळे वन विभागाचे अधिकारीही चक्रावले आहेत. जुन्नरच्या नागरी वस्तीतून ताब्यात घेण्यात आलेला हाच तो बिबटा होता का याचाही तपास केला जात आहे. वन विभागाने मात्र याबद्दल आताच नेमके खात्रीने सांगता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

मुरबाडच्या जंगलामध्ये प्राण्यांवर आणि माणसांवर हल्ला करणारा बिबटय़ा हा रक्ताला चटावला होता. त्याला पकडण्यासाठी पाच ठिकाणी पिंजरे लावण्यात आले होते. मात्र या पिंजऱ्याच्या अगदी जवळ येऊनही तो पिंजऱ्यात शिरत नव्हता. कदाचित पिंजरा आणि इतर पकडण्याच्या साधनांची त्याला माहिती असण्याची शक्यता आता जाणकार तसेच ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हा बिबटय़ा जुन्नरच्या जंगल परिसरातील असण्याची शक्यता असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मात्र, याचा इन्कार केला आहे. यापूर्वी सोडण्यात आलेला बिबटय़ाची उंची आणि प्रकृती वेगळी होती तसेच तो अन्य ठिकाणी सोडल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे हा बिबटय़ा जुन्नरच्या जंगलातील बिबटय़ा असण्याची शक्यता कमी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बिबटय़ाचा उपद्रव..

ठाणे वन विभागाच्या कार्यक्षेत्रातील मुरबाड तालुक्यातील टोकावडे दक्षिण व टोकावडे उत्तर या वन परिक्षेत्रात या बिबटय़ाने सुमारे दीड महिन्यांपासून धुमाकूळ घातला होता. त्याने ११ पाळीव प्राण्यांना ठार करून फस्त केले होते. पहाटे ४ ते सकाळी ६ आणि सायंकाळी ६ ते रात्री ८.३० या वेळात लोकवस्तीत शिरून शेळ्या, वासरे, कुत्रे यांच्यावर हल्ला करणे शिवाय माणसांवर हल्ला करण्याचे सत्र त्याने सुरू केले होते. गेल्या शुक्रवारी मीराबाई वरे यांच्यावर हल्ला करून त्यांना १५० मीटर लांबपर्यंत फरफटत नेले होते. तर रविवारी बारकू भोईर यांना ठार करून २५० मीटर लांब फरफटले होते. मढ (वाघवाडी) रामपूर, पळू, कळभांड या गावांमध्ये शिरून त्याने हल्ले केले होते. त्याला पकडण्यासाठी सर्वत्र पिंजरे लावण्यात आले होते. मात्रो हा बिबटय़ा बाजूला निघून जात होता.

एका गोळीने त्याचा वेध घेतला..

मुरबाड जिल्ह्यातील १५ हून अधिक गावांमध्ये दहशत माजवणारा हा बिबटय़ा वन अधिकाऱ्यांच्या केवळ एका गोळीमध्ये ठार झाला. गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता कळभांड गावाच्या परिसरात बिबटय़ा असल्याची माहिती गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिली होती. त्यांतर वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, टोकावडे पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पोलीस पथक दबा धरून बसले होते. हा बिबटय़ा त्यांच्या नजरेच्या टप्प्यात आल्यावर टोकावडे दक्षिण वन परिक्षेत्राचे वन क्षेत्रपाल तुळशीराम हिरवे यांनी त्यांच्याकडील बंदुकीने एक गोळी सोडली. ही गोळी बिबटय़ाच्या मस्तकात घुसल्याने हा बिबटय़ा जागच्या जागी कोसळून गतप्राण झाला, अशी माहिती ठाणे वन विभागाचे उपवनसंरक्षक किशोर ठाकरे यांनी दिली.

मुरबाड बिबटय़ाबद्दल..

  • वय – ८ वर्ष
  • लिंग – नर
  • वजन – ६० किलो