डान्सबारचे व्यसन आणि त्यामुळे कर्जबाजारी झाल्यामुळे पैसे कमवण्यासाठी लहान मुलांचे अपहरण करणाऱ्या एका आरोपीला पाच वर्षांनंतर जेरबंद करण्यात ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले. भूषण कराळे ऊर्फ भुश्या (२५) असे या आरोपीचे नाव असून २०१०मध्ये एका मुलाच्या अपहरणप्रकरणी त्याला अटक करण्यात आली. भूषण आणि त्याचा सहकारी भूषण मेंगळ (२५) या दोघांना बदलापूर येथून अटक करण्यात आली.

डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोंबिवली जिमखान्याच्या समोरून १५ जुलै २०१० एका १२ वर्षांच्या शाळकरी मुलाचे अपहरण झाले होते. मुलाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खंडणीसाठी मुलाचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आरोपीने खोपोली, मुलुंड, मुरबाड, अंबरनाथ अशा वेगवेगळ्या ठिकाणांहून सार्वजनिक फोन बुथवरून धमकावत मुलाला सोडण्यासाठी १५ लाखांची खंडणी मागितली होती. ही रक्कम ठाणे जिल्ह्य़ातील मुरबाड येथील नांदेणी गावातील जंगलामध्ये आणण्याचे आरोपींनी मुलाच्या वडिलांना सांगितले होते.

पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचला होता. पैसे घेऊन आरोपींनी मुलाला वडिलांच्या ताब्यात दिले. त्याच वेळी दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यांच्यावर झडप घातली. मात्र, पैशांची बॅग टाकून आरोपींनी पळ काढला. या वेळी आरोपींकडून पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली होती. पोलीस या आरोपींचा कित्येक महिने शोध घेत होते. अखेर हे दोघे बदलापूर येथे असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. त्यानंतर भूषण कराळे व भूषण मेंगळ यांना अटक करण्यात आली. या दोघांनी तीन मुलांचे अपहरण केल्याचे स्पष्ट झाले असून त्यांपैकी दोघांची हत्या केल्याचेही उघड झाले. या दोघांना ३० डिसेंबपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.