भिवंडी येथील कारीवली गावात एका धाब्याजवळ पावरलुमचा कारखाना आहे. या कारखान्याशेजारीच काही गोदामे आहेत. कारखाने आणि गोदामांच्या मधोमध एक गल्ली आहे. २७ जानेवारीला सकाळी ९ वाजता कामगार कामावर जाण्याच्या घाईत होते. नेहमीप्रमाणे कामगार गल्लीच्या मार्गे कारखान्याच्या दिशेने जात होते. त्या वेळी गल्लीजवळ रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या एका मृतदेहावर त्यांची नजर पडली. या प्रकारामुळे भेदरलेल्या कामगारांनी भोईवाडा पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर काही क्षणांतच भोईवाडा पोलिसांचे पथक धटनास्थळी दाखल झाले. मृताच्या डोक्यावर लाकडाचे आणि दगडाचे धाव दिसत होते. त्यामुळे त्याची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज बांधत पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यासाठी भोईवाडा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक जी. बी. गणेशकर यांना तक्रारदार करण्यात आले आणि त्यांची सरकारतर्फे तक्रार नोंदवून हा गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसांनी मृताची ओळख पटविण्याचे काम सुरू केले; परंतु, तिथे जमलेले कामगार मृत व्यक्तीला ओळखत नव्हते. यामुळे पोलिसांच्या पथकाने घटनास्थळाची तसेच मृतदेहाची बारकाईने पाहणी केली. या तपासणीत पोलिसांच्या हाती ठोस काहीच लागले नाही. तसेच त्याच्याजवळ ओळख पटविण्यासंबंधीचा कोणताही पुरावा सापडला नाही. त्यामुळे पोलीस थोडे निराश झाले आणि त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. मात्र, त्याची ओळख पटविण्यासाठी पोलिसांची धडपड सुरूच होती. त्यासाठी पोलिसांनी आसपासच्या पोलीस ठाण्यात बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारीचा आढावा घेतला; पंरतु मृत व्यक्तीच्या वर्णनाची कोणतीही तक्रार आसपासच्या पोलीस ठाण्यात दाखल नव्हती. अखेर पोलिसांनी मृत व्यक्तीचे फोटो काढून परिसरात त्याची विचारपूस सुरू केली तसेच काही खबरींमार्फत त्याची माहिती गोळा करण्यास सुरू केले. भिवंडीतील समरुबाग परिसरात पोलिसांचे पथक मृताचा फोटो दाखवून त्याची विचारपूस करीत होते. त्या वेळी मृताचे नातेवाईक पोलिसांना भेटले आणि त्यांनी मृत व्यक्ती रशीद (बदलेले नाव) असल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी नातेवाईकांना रुग्णालयात नेले आणि तिथे मृतदेह दाखवून पुन्हा एकदा खात्री करून घेतली. रशीदची ओळख पटल्यानंतर त्याच्या मारेकऱ्यांना शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे होते. त्यामुळे भिवंडीचे पोलीस उपायुक्त सुधीर दाभाडे
यांच्या मार्गदर्शनाखाली भोईवाडा पोलीस
ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. आर. पवार यांच्या पथकाने या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू केला.
भिवंडीतील समरुबाग गावात रशीद राहत होता. पत्नी आणि मुलगी असा त्याचा परिवार. मुलगी सातवी इयत्तेत शिकते. थंडीच्या मौसमात रशीद पावरलूममध्ये तर उन्हाळ्यात बर्फाचा गोळा विकण्याचे काम करायचा. पक्की नोकरी नसल्यामुळे तो अशा प्रकारे मोसमानुसार कामे करायचा. यातून मिळणाऱ्या पैशातून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. अशी सविस्तर माहिती पोलिसांनी तपासादरम्यान मिळवली. रशीद हा सायंकाळपासून घरी परतलेला नव्हता आणि पत्नीने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला नव्हता. तसेच तो बेपत्ता असल्याची तक्रारही नोंदविली नव्हती. यामुळे रशीदच्या हत्येमागे त्याच्या पत्नीचा हात असल्याचा संशय पोलिसांना येत होता. त्या दिशेने तपास करण्यासाठी पोलिसांनी त्याच्या पत्नीकडे चौकशी केली, मात्र त्यामध्ये पोलिसांना कोणताच धागादोरा मिळत नव्हता. त्याचबरोबर घटनास्थळाजवळील कारखाने आणि गोदामांच्या परिसरात बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पोलीस तपासत होते. त्यात रशीद आणि त्याच्यासोबत दोघे जण असे तिघे एकत्र जाताना दिसत होते. मात्र, तेथून परताना दोघेच जण दिसत होते. त्यात रशीद नव्हता. यामुळे रशीदचा खून ओळखीच्या व्यक्तीनेच केला असावा, असा अंदाज पोलिसांनी बांधला आणि त्या दिशेने तपासाची चक्रे फिरवली. असे असतानाच रशीदच्या पत्नीचे परिसरातील अकबर (बदलेले नाव)सोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे पोलिसांनी तपास सुरू केला आणि अकबरचा ठावठिकाणा शोधला. तेथून अकबरला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची याप्रकरणी चौकशी सुरू केली; परंतु त्याच्याकडून काहीच माहिती मिळत नव्हती. अखेर पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने रशीदच्या हत्येची कबुली दिली. तसेच रशीदची हत्या का आणि कशासाठी केली, याचा सविस्तर उलगडाही त्याने पोलिसांपुढे केला.
रशीद आणि अकबर हे दोघे एकाच परिसरातील रहिवासी असल्याने त्यांची एकमेकांशी चांगली ओळख होती. या ओळखीमुळे अकबर त्याच्या घरी येत जात असे. यातूनच रशीदच्या पत्नीसोबत त्याचे प्रेमसंबंध जुळले. अकबर हा अविवाहित होता व काहीच कामधंदा करत नव्हता. गेल्या दोन वर्षांपासून त्यांचे रशीदच्या पत्नीसोबत प्रेमप्रकरण सुरू होते. मात्र, त्याचा सुगावा रशीदला नव्हता. महिनाभरापूर्वी रशीदला त्याबाबत कळले आणि त्यांनी अकबरच्या घरी जाऊन शिवीगाळ केली होती. यामुळे अकबरच्या मनात अपमानित झाल्याची भावना निर्माण झाली होती. तसेच शिवीगाळमध्ये वडिलांचा उद्धार केल्यामुळे त्याच्या मनात सल होती. यातूनच त्याने बदला घेण्यासाठी रशीदच्या हत्येचा कट रचला. त्यासाठी त्याने रशीदला ओळखत असलेल्या दोघांची मदत घेण्याचे ठरविले. या दोघांची त्याने २६ जानेवारीला भेट घेतली आणि त्यांना रशीदला मारण्यासाठी २० हजारांची सुपारी दिली. त्यानुसार, त्यापैकी एकजण रशीदच्या घरी गेला व त्याने त्याचा दरवाजा ठोठावला. रशीदच्या मुलीने दरवाजा उघडताच त्याने रशीदबाबत विचारणा केली. त्या वेळी घरात असलेला रशीद दरवाजापाशी आला. दरवाजात उभी असलेली व्यक्ती त्याच्या परिचित होती. यानंतर त्यांच्यात काही तरी बोलणे झाले आणि रशीद त्याच्यासोबत घराबाहेर पडला. थोडय़ा दूर अंतरावर उभा असलेला त्यांचा दुसरा साथीदार त्यांना भेटला. या दोघांनी रशीदला बोलण्यात गुंतवून कारीवली गावाच्या परिसरात नेले. यानंतर तेथील कारखाने आणि गोदामांच्या मधोमध असलेल्या गल्लीत नेऊन त्याच्या डोक्यावर लाकडी दांडय़ाने व दगडाने प्रहार केला. त्यात रशीदचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर दोघे तेथून पळून गेले. या दोघांच्या शोधासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. आर. पवार यांनी पथक तयार केले होते. त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक ए. व्ही. वाढवे, पोलीस हवालदार आर. एस. मागी, ए. एस. उत्तेकर, आर. डी. उबाळे, एस. एस. जाधव, पोलीस नाईक जी. एस. शर्मा,
ए. टी. पवार, आर. डी. ठोके, पोलीस शिपाई डी. के. चंद्रात्रे, एस. बी. सोनावणे, एस. जी. कदम, वाय. एन. कवडे, डी. आर. कोरडे यांचा समावेश
होता. या पथकाने या दोघांचा शोधून त्यांना अटक केली.