दीड महिन्यात सात घटना उघडकीस

ठाणे : पत्नीच्या चारित्र्यावर संशय, आर्थिक कारणे, उधारीचे पैसे या कारणांवरून ठाण्यात गेल्या दीड महिन्यांमध्ये नातेसंबंधातील हत्येचे प्रकार वाढलेले आहेत. ठाणे आणि भिवंडी शहरात अशा प्रकारच्या गुन्ह्यांचे सात प्रकार उघडकीस आले आहेत. समोरील व्यक्तीविरोधात मनात साठून असलेला राग आणि करोनामुळे आलेला मानसिक तणाव यांमुळे हे प्रकार व्यक्तीच्या हातून घडत असल्याची शक्यता मानसोपचारतज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरात करोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्यानंतर गुन्हेगारीचा घसरलेला आलेख आता पुन्हा वाढू लागल्याचे चित्र आहे. मात्र, यासोबतच एक चिंताजनक बाबही निदर्शनास येऊ लागली आहे. गेल्या दीड महिन्यांत ठाणे, भिवंडी या शहरांत नातेसंबंधातून झालेल्या हत्यांमध्ये वाढ होऊ लागली आहे. असे सात प्रकार शहरांमध्ये घडले आहेत. या हत्यांमध्ये आरोपी हे मृतांचे मित्र आणि पती असल्याचे समोर आले आहे. आपआपसातील वादामुळेच रागाच्या भरात अनेकांनी हत्येचा गुन्हा केला असल्याचे पोलीस सांगतात, तर करोनाचा तणाव तसेच अनेक दिवसांपासून समोरील व्यक्तीविषयी मनामध्ये साठून असलेला राग यांमुळे हे प्रकार घडत असल्याचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. यश वेलणकर यांनी सांगितले. त्यासाठी अशा व्यक्तीनी आपण स्वत: तणावात असल्याचे मान्य करून उपाय करायला हवे, असेही त्यांनी सांगितले.

हत्येच्या घटना

* पहिली घटना-४ सप्टेंबर

घोडबंदर येथील वाघबीळ भागात राहणाऱ्या अक्षय डाकी (२०) याचा त्याच्या मित्राने सोनसाखळी चोरीसाठी खून केला. त्याचा गळा आवळून खून करून मृतदेह खाडीत फेकला.

* दुसरी घटना- १४ सप्टेंबर

भिवंडी येथील वडवली भागात सोनसाखळी चोरीच्या उद्देशाने आकाश शेलार (२०) याचा त्याच्या मित्राने दगडाने ठेचून खून केला.

* तिसरी घटना- २० सप्टेंबर

वाघबीळ येथे सावत्र भावाने संपत्तीच्या वादातून गोळी झाडून खून केल्याचा प्रकार घडला. त्यानंतर त्याचा मृतदेह खाडीत फेकला होता. ही दोन्ही मुले एका नगरसेवकाची आहेत.

* चौथी घटना- २७ सप्टेंबर

भिवंडी येथील कामतघर भागात गुरुनाथ पाटील (६५) यांचा त्यांच्या मुलाने घरातच धारदार शस्त्राने खून केला. पूर्ववैमन्यस्यातून हा खून झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

* पाचवी घटना – ८  ऑक्टोबर

भिवंडीत पतीच्या छळाला आणि मारहाणीला कंटाळून ज्योती गायकवाड (३०) हिने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.

* सहावी घटना – १२ ऑक्टोबर

भिवंडीत लक्ष्मी भारती (४०) हिच्या पतीने चारित्र्याच्या संशयावरून तिला लोखंडी रॉडने मारहाण केली. यात तिचा मृत्यू झाला.

* सातवी घटना-१५ ऑक्टोबर

घोडबंदर येथील कासारवडवली भागात मित्राने जेवणाच्या उधारीचे पैसे दिले नाहीत. म्हणून आशू बर्मन (२५) याने मित्राचा खून केला.