अल्पवयीन मुलीचे अश्लील छायाचित्र काढल्याने संतप्त पित्याने एका इसमाची हत्या केली आहे. तब्बल दीड महिन्यानंतर या हत्येचा उलगडा करम्ण्यात वसईच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलीच्या पित्यासह दोन आरोपींना अटक केली आहे.

मृत सुहास धोंडे (३८) हा वसईतील कोळीवाडय़ात राहतो. १६ ऑक्टोबरपासून तो बेपत्ता होता. त्याचा मृतदेह मनोरच्या जंगलात आढळला होता. कुऱ्हाडीने त्याची हत्या करण्यात आली होती. एका खड्डय़ात त्याचा मृतदेह टाकण्यात आला होता. मनोर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल होता. मात्र मृताची ओळख पटत नसल्याने या प्रकरणाचा तपास थांबला होता.

वसईच्या स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मृत तरुणाचे छायाचित्र सर्व ठिकाणी लावले होते. ते छायाचित्र मृत सुहास धोंडे याच्या एका नातेवाईकाने ओळखले. त्याची ओळख पटल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीतेंद्र वनकोटी, पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे यांच्या पथकाने तपासाची सूत्रे वेगाने हलवली. मृत सुहास धोंडे यांच्या मोबाईलवरून त्यांच्या संपर्कात असलेली माणसांची चौकशी सुरू केली. या तपासानंतर पोलिसांनी वसई कोळीवाडय़ात राहणारा आरिफ काझी (४२) आणि विक्रमगड येथून अंकुश साने (४५) या दोन्ही आरोपींना अटक केली.

मृत सुहास धोंडे आणि आरोपी आरिफ काझी एकाच परिसरात राहतात. आरोपी आरिफच्या अल्पवयीन मुलीचे अश्लील छायाचित्र सुहास धोंडेने आपल्या मोबाईलमध्ये काढले होते. त्याचा राग आरोपीला होता. त्यामुळे त्यांनी आपला सासरा अंकुश साने याच्या मदतीने हत्येची योजना बनवली. १६ ऑक्टोबर रोजी त्याला झोपेच्या गोळ्या देऊन बेशुद्ध केले आणि आपल्या गाडीतून मनोरच्या जंगलात नेले. तेथे हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावली.

याबाबत माहिती देताना पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे यांनी सांगितले की, आम्हाला मृताची ओळख पटल्यानंतर तीन दिवसात दोन्ही आरोपींना अटक केली. या प्रकरणात नेमके कारण काय त्याच्या सर्व शक्यता तपासत आहोत. आपल्या मुलीचे अश्लील छायाचित्रे काढल्याचा राग आल्याने आरोपीने हत्या केली  बेपत्ता व्यक्तींच्या शोधासाठी नेमलेल्या पथकाने वेळीच तपास केला असता तर आरोपींना अटक झाली असती, असे ते म्हणाले.