भारतीय कलेचा वारसा जपणाऱ्या अनेक संस्थांपैकी एक संस्था म्हणजे पुण्यातील कोलवण येथील ‘चिन्मय नादबिंदू’. येथे गुरुकुल पद्धतीने भारतीय कलांचे प्रशिक्षण दिले जाते.

चिन्मय विश्वविद्यापीठाच्या दिशेने मार्गक्रमण करणाऱ्या चिन्मय नादबिंदूच्या विद्यार्थ्यांनी रविवारी ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात चिन्मयांजली हा कार्यक्रम सादर केला. चिन्मय मिशनचे संस्थापक स्वामी चिन्मयानंद यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात चिन्मय नादबिंदूच्या संचालिका प्रमोदिनी राव यांच्या गायनाने झाली.
त्यांनी शास्त्रीय संगीताच्या अंगाने जाणाऱ्या भक्तीरचना सादर केल्या. गुरूचे महत्त्व विशद करणाऱ्या या रचनांनी संपूर्ण सभागृहाला भक्तिमय वातावरणाने भारून टाकले. तसेच चिन्मय नादबिंदूविषयी माहिती देणारी ध्वनिचित्रफीत दाखविण्यात आली. ज्यामध्ये चिन्मय नादबिंदूची आजपर्यंतची वाटचाल आणि भविष्यातील उपक्रमांविषयी माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाचा शेवटच्या सत्रात संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. विद्याधर व्यास यांचे गायन झाले. त्यांनी आपल्या गायनात राग देस सादर करत सर्व रसिकजनांना मंत्रमुग्ध केले. यापाठोपाठ त्यांनी पायोजी मैने राम रतन धन पायो हे भजन सादर केले. तसेच पं.व्यास यांनी त्यांचे आवडीचे वैष्णव जन तो हे भजन सादर केले. दोन्ही कलाकारांना तबल्यावर साथ मंदार पुराणिक यांनी दिली आणि निवेदन निरंजन लेले यांनी केले.

स्मिता पाटीलच्या आठवणींना उजाळा

प्रतिनिधी, ठाणे<br />‘गगन सदन तेजोमय’, ‘मी रात टाकली मी कात टाकली’, ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजतो’ यांसारख्या बहारदार गीतांसोबत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा जीवनपट व त्यांच्या चित्रपट कारकीर्दीचा आस्वाद ‘मूर्तिमंत अस्मिता’च्यानिमित्ताने ठाण्यातील रसिकांनी घेतला.
सिद्धांत प्रतिष्ठानच्या वतीने महोत्सव एंटरटेनमेंटतर्फे शनिवारी गडकरी रंगायतन येथे मूर्तिमंत अस्मिता हा अभिनेत्री स्मिता पाटील यांच्यावर आधारित कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सुप्रसिद्ध कलाकार उमेश कामत व मधुरा वेलणकर यांनी आपल्या खुमासदार शैलीत कार्यक्रमाचे निवेदन केले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ठाणेकरांचा गुणीजन पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
यावेळी सरस्वती विद्यामंदिरच्या अध्यक्षा मीरा कोर्डे, चित्रकार विजयराज बोधनकर, आंतरराष्ट्रीय रिदमिक जिम्नॅस्टिकपटू पूजा सुर्वे, विशेष मुलांसाठी काम करणाऱ्या आत्मन केंद्राच्या मंजुश्री पाटील, अंध गझलकार मजहर शेख, सामाजिक कार्य करणाऱ्या वर्षां परचुरे, राष्ट्रीय जलतरणपटू त्रिशा कारखानीस, शॉर्टफिल्म मेकर अनुराग जाधव व जाणिवांची किमयागार लक्ष्मी त्रिपाठी आदी ठाणेकरांचा ठाणे गुणीजन पुरस्कारने सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात स्मिता पाटील यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेल्या विविध चित्रपटांतील गीते सादर केली. त्याचसोबत स्मिता पाटील यांच्या अनेक आठवणींना उजाळाही देण्यात आला. त्यांच्यासोबत काम केलेल्या अनेक दिग्गजांनी त्यांच्या विषयी व्यक्त केलेली मते, भावना आणि अनेक आठवणी ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून दाखवल्या गेल्या. गमन या हिंदी चित्रपटातील आपकी याद आती रही रात भर, मरो गामकाठो पारे जहा दुध की नदिया बाहे, सावन के दिन आये सजना आन मिलो, दिखाई दिए यु की बेखुद किया यासारख्या बहारदार गाण्यांनी मैफल रंगली. अर्चना गोरे, सोनाली कर्णिक, मैथिली पानसे, प्रशांत नासेरी यांनी गीते सादर केली. याप्रसंगी साधना प्रधान, स्मिता पाटील यांचे वडील शिवाजीराव पाटील, बहीण अनिता पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

कल्याणमध्ये ‘रुपेरी वाळूत’चे आयोजन

प्रतिनिधी, ठाणे
म्हैसकर फाऊंडेशन प्रस्तुत व अनंत वझे संगीत, कला आणि क्रीडा प्रतिष्ठान आयोजित अनिल-अरुण यांच्या ४५ वर्षांच्या सांगीतिक कारकीर्दीवर आधारित ‘रुपेरी वाळूत’ हा कार्यक्रम नुकताच आचार्य अत्रे रंगमंदिर कल्याण येथे सुप्रसिद्ध पाश्र्वगायिका अनुराधा पौडवाल, कविता व आदित्य पौडवाल, शेखर महामुनी यांनी सादर केला. कार्यक्रमाची सुरुवात ‘रुपेरी वाळूत’ या सुप्रसिद्ध गाण्याने झाली. येऊ कशी प्रिया.., काळ्या मातीत मातीत.., दाटून कंठ येतो.., हृदयी वसंत फुलताना.., रजनीगंधा.. अशी एकापेक्षा एक सरस गाण्यांची मेजवानी कल्याणकरांनी अनुभवली. सौरभ गाडगीळ यांच्या हस्ते सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे मांगीलाल जैन यांनी सर्व कलाकारांचा सन्मान केला.
सुप्रसिद्ध कर्करोगतज्ज्ञ डॉ. मनोज लोखंडे यांच्या सहकार्याने अनंत वझे संगीत, कला आणि क्रीडा प्रतिष्ठानतर्फे कॅन्सर साक्षर महाराष्ट्र अभियान’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत निरनिराळ्या आदिवासी पाडय़ांवर व खेडेगावांमध्ये विनामूल्य शिबिरांद्वारे गरजू रुग्णांना मार्गदर्शन व उपचार केले जाणार आहेत, अशी माहिती विद्यालयाचे विश्वस्त डॉ. गौरी वझे, डॉ. ईशा पानसरे, डॉ. कविता तोडकर यांनी दिली. यावेळी सुप्रसिद्ध पाश्र्वगायिका अनुराधा पौडवाल यांनी एज्युकेट ए फार्मर चाईल्ड हा उपक्रम सुरू करून त्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या ५ मुलांचा १०वीपर्यंतचा संपूर्ण शिक्षणाचा खर्च करण्याचे जाहीर केले अष्टविनायक चित्रपटातील सुप्रसिद्ध अष्टविनायक गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.