सिनेसंगीत हा आपल्या सांस्कृतिक विश्वाचा अविभाज्य घटक असला तरी काहींना जुनी गाणी आवडतात तर काहींना नवी. काही संगीतकार मात्र त्याला अपवाद आहेत. त्यांची गाणी कायम सदाबहार आणि टवटवीत वाटतात. संगीतकार मदन मोहन, ओ. पी. नय्यर, आर. डी. बर्मन आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल आदींचा त्यात समावेश करावा लागेल. सत्तर आणि ऐंशीच्या दशकात हिंदी सिनेमा सृष्टीवर अधिराज्य गाजविलेल्या लक्ष्मीकांत-प्यारेलाल जोडगोळीपैकी संगीतकार प्यारेलाल यांना ‘याचि डोळा याचि देही’ पाहण्याचा, त्यांच्या संगीत संयोजनात त्यांचीच गाणी ऐकण्याचा योग ठाणेकरांसाठी गेल्या शनिवारी जुळून आला. डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात विलक्षण रंगलेल्या या मैफलीत ‘दोस्ती’ ते ‘कर्ज’ या काळातील अनेक सदाबहार गाणी सादर करण्यात आली.
विविध प्रकारच्या ५० वादकांचा ताफा आणि १२ सहगायकांचा कोरस अशा भव्य कॅनव्हासवर ही सदाबहार गाण्यांची मैफल रंगली. त्यात जानेवालो जरा (दोस्ती), ये रेशमी जुल्फे, परबत के इस पार (सरगम), झिलमिल सितारों का आंगन होगा (जीवन मृत्यू), ढल गया दिन (हमजोली), पर्दा है पर्दा (अमर अकबर अँथनी), हुई श्याम उनका खयाल आया (मेरे हमदम मेरे दोस्त), शीर्षकगीत (पत्थर के सनम), दर्दे ए दिल (कर्ज), बने चाहे दुश्मन (दोस्ताना) आदी एकापेक्षा एक गाणी या मैफलीत सादर करण्यात आली. सुप्रसिद्ध पाश्र्वगायक श्रीकांत नारायण, सारिका सिंग, राजेश अय्यर, मनीषा जांभोटकर, सारिका, आनंद बहेल यांनी ही गाणी सादर केली. जीतेंद्र ठाकूर आणि आनंद सहस्रबुद्धे यांनी संगीत संयोजन तर भीमसिंग कोटल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.