लयबद्ध शब्दांना कविता म्हणतात पण या कविता जेव्हा आयुष्याचे गणित शब्द आणि सुरातून उलगडतात तेव्हा आयुष्यात पडलेल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे अलगदपणे उलगडतात. क्षितिजाच्या पल्याड जाऊन जेव्हा हे शब्द पंचमहाभुतांच्या विश्वात रमतात, तेव्हा या शब्दांना रसिकही मनापासून दाद देतात. त्या सूर व शब्दमयी कार्यक्रमांची उंची नभाला जाऊन स्पर्श करते. त्यातील काही शब्द अलवार पाठीवरून हात फिरवतात. काही शब्द मनावर अधिराज्य करतात. अनुभवांचा खजिना जेव्हा सूत्रबद्धपद्धतीने नेमक्या शब्दांत बांधला जातो, तेव्हा कविता जन्म घेते. डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले येथे सादर झालेल्या ‘आयुष्यावर बोलू काही’ या कार्यक्रमामध्ये सलिल कुलकर्णी आणि संदीप खरे यांनी अनुभवांचा हा पेटारा रसिकांसमोर पुन्हा एकदा शब्दांतून उघडला आणि डोंबिवलीकर रसिक त्यात चिंब झाले.
संवादिनीच्या हलक्या स्वराच्या पाश्र्वभूमीवर अर्थ आणि गेयपूर्ण शब्दांची बरसात सुरू झाली. पहिलेच गाणे- ‘सरीवर सरी.’ गाणे आणि पावसाचे अनोखे नाते असते. ते नाते कवी आणि गायकांमुळे घट्ट विणलं गेलं आहे. या नात्याची वीण अधिक घट्ट व्हावी यासाठीच हे गाणे गायले असावे असा भास सभागृहात झाला. त्यानंतर ‘अग्गोबाई ढग्गोबाई’ या गाण्यावर चिमुरडय़ांसह मोठय़ांनीही टाळ्यांचा ताल धरला. पालकांना नेहमीच मुलांच्या अभ्यासाची काळजी सतावत असते. मुले मात्र अभ्यासानंतर येणारी सुट्टी आणि त्या सुट्टीत कशी मजा करायची याचे बेत आखत असतात. या भावनांवर आधारित परीक्षेला तीस दिवस सहा पेपर मग सुट्टी हे गाणे सादर केले आणि पालकांसह चिमुरडय़ांनी या गाण्याचेही कौतुक केले. पावसाचे आणखी एक पाऊसराव नावाचे गाणे सादर झाले. त्यात मनमौजी पावसाच्या स्वभावाचे अत्यंत मिश्कील वर्णन करण्यात आले आहे. उन्हाळ्याने हैराण झालेल्या सृष्टीला आपल्या आगमनाने हिरव्यागार दुलईची भेट देणारा पाऊस निसर्गामध्ये प्राण आणतो. अतिशय हळुवारपणे संदीप खरे यांनी पावसाचे हे कार्य आपल्या शब्दांतून मांडले आहे.
प्रेम ही नाजूक भावना असते. महाविद्यालयीन वयात प्रत्येकजण स्वप्नांच्या हिंदोळ्यावर आकाशी झेप घेत असतो. अशा वेळी कवीच्याही मनात भावना दाटून येतात आणि शब्दांच्या झोपाळ्यांवर ते विसावतात. अगदी त्याचप्रमाणे सलिल कुलकर्णी यांनी एकदाच ओंजळीत दे ना जाई-जुई या गाण्यातून उपस्थित युवकांच्या भावना सादर केल्या आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. मध्यांतरानंतर गाण्यांची ही मैफल अधिकच रंगत गेली. यावेळी प्रेक्षकांच्या पसंतीची गाणी सलिल कुलकर्णी आणि संदीप खरे यांनी सादर केली. ‘पप्पांचा ढापून फोन, फोन केले एकशे दोन’ हे गाणे गायल्यानंतर एका छोटय़ा मुलाने ‘करून करून काळजी माझी’ हे शुभंकर कुलकर्णी यांनी गायलेले गाणे सलील कुलकर्णीसमोर सादर केले. खरे तर बोबडय़ा बोलांमुळे शब्द जरी ऐकू येत नसले तरी भावनेचा आदर करणाऱ्या जाणकार डोंबिवलीकर रसिकांनी टाळ्या वाजवून त्याचे कौतुक केले.
सलिल कुलकर्णी यांनीही हा मुलगा नक्कीच आई-बाबांना गाडीतून फिरवेल असे म्हणून त्याच्या गाण्याला दाद दिली. त्यानंतर करून करून गाव हे गाणे सादर केले. ‘भय इथले संपत नाही’, ‘कसे सरतील सये’, ‘आज मी आयुष्य माझे नेमके चाचपाया लागलो, नेमके ते हरवले जे मी जपाया लागलो’ ही कविता सादर केल्यानंतर क्या बात है अशी दाद प्रेक्षकांनी दिली. कलाकर जेव्हा कार्यक्रम सादर करतात, ‘नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो’, ‘दिवस असे की कोणी माझा नाही, अन् मी कोणाचा नाही’ ही गाणी सादर झाल्यानंतर प्रेक्षकांनी फर्माइश केलेल्या ‘नामंजूर’ या गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली.