कला-संस्कृती यांचा मिलाफ..जोडीला खाद्यपदार्थाची चंगळ..लहान मुलांसाठी खेळांचे विविध पर्याय.. संगतीला गीत संगीताची मैफल अशा अनोख्या कलाविष्काराने रंगलेल्या ‘जत्रेला’ डोंबिवलीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जत्रेमुळे डोंबिवलीकरांचा रविवार सार्थकी लागला. काळा घोडा फेस्टिव्हलच्या धर्तीवर झालेल्या या महोत्सवाला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची विशेष उपस्थिती लाभली होती.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या डोंबिवली शहर शाखेच्या वतीने डोंबिवली जिमखाना येथील भव्य पटांगणात तीन दिवसांची कला जत्रा भरविण्यात आली होती. या जत्रेत चमचमीत खाद्यपदार्थाची चंगळ तर होतीच, त्या जोडीला प्रसिद्ध चित्रकार, अक्षररचनाकार, शिल्पकार यांच्या कलेचा आविष्कार पाहायला मिळाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते जत्रेचे उद्घाटन झाल्यानंतर अच्युत पालव आणि राम कस्तुरे यांच्या कॅलिग्राफीची अनोखी जुगलबंदी अनुभवता आली. रसिकांनी या दोन्ही कलाकारांच्या कलेला उत्तम दाद दिली.
आर्ट गॅलरीमध्ये गणेश अडवल, चंद्रजीत यादव यांची शिल्पकला, अच्युत पालव, विजयराज बोधनकर व राम कस्तुरे यांचे प्रत्येकी ५० हून अधिक कलाकृतींचे प्रदर्शन येथे मांडण्यात आले होते. मनोज सकळे या पोटर्रेट कलाकाराच्या चित्रकारितेची प्रात्यक्षिके, उदय मोहिते, रोहन वायकर व शैलेश आमरे यांच्या चित्रकलेची प्रात्यक्षिके, संजय हिरास्कर यांचे लडाख येथील छायाचित्र, परशुराम पाटील, राम कस्तुरे यांनी काढलेले चित्र प्रदर्शन रसिकांचे खास आकर्षण ठरले. अनेक रसिकांनी आपल्या नावातील श्रीगणेशा, स्वतचे स्केच या जत्रेत काढून घेतल्याचे संदीप वेंगुर्लेकर यांनी सांगितले.
राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या कलाकारांच्या कलाकृती पाहण्यासाठी एरवी रसिकांना मुंबई येथील आर्ट गॅलरी किंवा महोत्सवात जावे लागते. मात्र सर्वसामान्य प्रेक्षकांना डोंबिवलीत या मोठय़ा कलाकृतींचा आस्वाद घेता यावा, यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती आयोजक राजू पाटील यांनी दिली. खाद्य जत्रेतील कुकरी शोमध्ये शेफ मनोज लिमये, विष्णू मनोहर आणि देवरथ जातेगावकर यांनी तयार केलेल्या स्वादिष्ट पदार्थाची चव खवय्यांनी चाखायला मिळाली. त्यांच्याकडून जेवणाच्या साध्या टिप्सही घेतल्या. तसेच मालवणी, खानदेशी, कोल्हापुरी आदी विविध शाकाहारी, मांसाहारी खाद्यपदार्थाचे स्टॉल्स येथे होते. कोळंबीची करंजी, ब्रेडचा पिझ्झा, इटालियन पिझ्झाला मराठी तडका, पुणेरी आरोग्यवर्धक पान हे या खाद्यजत्रेतील वैशिष्टय़ ठरले.
सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे, सावनी शेंडे यांनी मर्मबंधातील ठेव हा कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी पाश्चात्त्य कलेतील जिनो बॅन्कस यांचा ड्रम, विवेक सोनार यांची बासरी, किशोर पांडे यांचा तबला, पं. रवि चारी यांचे सतारवादन आणि अतुल रनिंगा यांचे कॅशियो वादनाच्या अनोख्या संगमाने डोंबिवलीकर मंत्रमुग्ध झाले.
या जत्रेत विक्री झालेल्या कलावस्तूंच्या रकमेतील १० टक्के रक्कम प्रकाश आमटे यांच्या आनंदवन या सेवाभावी संस्थेला देण्यात आली. यावेळी मनसेचे सरचिटणीस नितीन सरदेसाई, आनंदवनचे कौस्तुभ आमटे, आमदार रवींद्र चव्हाण, स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे, परिवहन सभापती नितीन पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल अडवाणी, राजू पाटील, राजेश कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

बच्चेकंपनीसोबत छोटा जोकर, डुग्गू!
मुलांसाठी येथे छोटा जोकर, डुग्गू, छोटा भीम, टॉम, लांब पायाचा माणूस यासोबतच बोटिंग, रोलिंग, पाण्यातील विविध खेळ, बाटलीतील खेळ अशा विविध खेळांची रेलचेल होती. बच्चेकंपनीनेही याचा मनमुराद आनंद लुटला. मुग्धा वैशंपायन हिच्या गायनाने डोंबिवलीकरांना मंत्रमुग्ध केले, त्यानंतर निनाद आजगावकर आणि निलाक्षी पेंढरकर यांचे संस्कृतीचे देणे या बहारदार संगीताच्या कार्यक्रमाने जत्रेला एक वेगळीच रंगत भरली. याप्रसंगी कला साहित्य क्षेत्रातील प्रभाकर जोग, सुरेश खरे, वसंत आजगांवकर, नंदू होनप, प्रशांत ठाकरे या मान्यवरांचा सत्कार मनसेच्या वतीने करण्यात आला.