News Flash

वीकेण्ड विरंगुळा : मुकेश-रफी-किशोर यांच्या गाण्यांची मैफल

महंमद रफी आणि किशोरकुमार यांच्या सदाबहार गीतांवर आधारित मैफल आयोजित करण्यात आली आहे.

‘अल्फा साज और आवाज’ यांच्या वतीने शुक्रवार, २६ फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजता आचार्य अत्रे रंगमंदिरमध्ये ‘मेलडी मास्टर्स’ हा हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज पाश्र्वगायक मुकेश, महंमद रफी आणि किशोरकुमार यांच्या सदाबहार गीतांवर आधारित मैफल आयोजित करण्यात आली आहे. अनिरुद्ध, लॉरेन्स, प्रकाश सोनटक्के, आदिल शेख हे कलावंत या मैफलीत या दोन्ही गायकांची सदाबहार गाणी सादर करणार आहेत. जाहिद शेख हे कार्यक्रमाचे सूत्र संचालन करणार आहेत. मनोज शिवलिंग आणि संतोष पवार संगीत संयोजन करणार आहेत.
’ कधी- शुक्रवार, २६ फेब्रुवारी, रोजी, वेळ-रात्री ८.३०
’ कुठे- आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण (प.)

सावरकरांचे स्मरण
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आणि त्यांचे देशभक्तिपर कार्य तरुण पिढीपर्यंत पोहोचावे व युवकांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना वृद्धिंगत व्हावी या हेतूने सावरकरांच्या ५० व्या स्मृतिवर्षांनिमित्त क्षितिज ग्रुप, कल्याणच्या वतीने २६ व २७ फेब्रुवारी रोजी ठाणे पूर्व येथे ‘सावरकर स्मरण’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सावरकरांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना संदर्भासहित असलेली शंभरहून अधिक दुर्मीळ छायाचित्रे, सावरकरांचे निवडक स्फुट लेख व विचार तसेच सावरकरांनी लिहिलेल्या कविता आणि मराठी भाषा शुद्धीकरणासाठी सावरकरांनी केलेले कार्य हे ठाणेकरांना या प्रदर्शनातून पाहायला मिळेल. सावरकरांच्या आयुष्यावर आधारित पुस्तकांचे प्रदर्शनदेखील या निमित्त आयोजित केले आहे .
’ कधी : २६ व २७ फेब्रुवारी, वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ९
’ कुठे : खुले कलादालन, अष्टविनायक चौक, मीठबंदर रोडजवळ, ठाणे (पूर्व) झ्र्४००६०३

गझल मैफल
ठाण्यातील रसिक प्रेक्षक गझलला नेहमीच आपलेसे करतात आणि म्हणूनच मराठी राजभाषा दिनाच्या निमित्त घंटाळी प्रबोधिनी संस्थेच्या वतीने शनिवार, २७ फेब्रुवारी रोजी ‘गझल के बहाने’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी मराठी व उर्दू गझल गायन- वाचनाची ही अनोखी मैफल असून विविध गझल येथे पेश होणार आहेत. या वेळी विविध विषयांवर परखड भाष्य करणाऱ्या मराठी गझल सादर होणार आहेत.
’ कधी- शनिवार,२७ फेब्रुावरी, सायंकाळी ६.३०वाजता
’ कुठे- मैफल घंटाळी मैदान, ठाणे

दागिन्यांची रास.
आपले सौंदर्य खुलविण्यासाठी दागदागिने घालून सजणे हे मानवजातीला फार पुरातन कालापासून ठाऊक आहे. स्त्रियांना फुलांच्या माळा, हार, गजरे यांपासून ते सोने, चांदी, रुपे, मोती, पोवळे, हिरे आणि आता प्लॅटिनम या सर्वापासून बनविलेले दागिने घालून मिरवायला मनापासून आवडते. महाराष्ट्रातील स्त्रिायांची नथ व पुरुषांची भिकबाळी हे अगदी वेगळे असे दागिने आहेत. याशिवाय बोरमाळ, कोल्हापुरी साज, ठुशी, तन्मणी, चपलाहार, चिंचपेटी.. यादी खूप मोठी आहे. महाराष्ट्रातील या दागदागिन्यांची झलक कल्याणकरांना अनुभवता येणार आहे. पारंपरिक दागिन्यांपासून ते आधुनिक दागिन्यांमधील विविध कलाकुसरी या प्रदर्शनाच्या निमित्ताने पाहता येतील.
’ कुठे- ठाकूरवाडी, पानेरी साडीच्या समोर, ठाणे(प.)
’ कधी- दररोज दुपारी १२ ते रात्री ९

विविआना मॉलमध्ये पाश्चात्त्य संगीताचे फ्युजन
तरुणांमध्ये सध्या वेस्टर्न म्युझिकची क्रेझ हळूहळू वाढत असली तरीही भारतीय संगीत आजही तरुणांच्या मनामनात भिनते आहे.गाण्यांची जादू तरुणाईवर सर्वाधिक असल्याचे चित्र दिसते. नॅशनल स्कूल ऑफ परफॉर्मिग आर्टच्या विद्यार्थ्यांच्या इंडियन सागा बॅण्ड हल्लीच्या तरुणांची आवड लक्षता घेऊन गाणी सादर करणार आहेत. विविआना मॉल व्यवस्थापनातर्फे ठाणेकरांच्या विकेण्डची रंगत वाढविण्यासाठी
बॅण्डचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० ते रात्री ९ या वेळेत विविआना मॉल , ठाणे (प.) येथे हा कार्यक्रम होणार आहे.
’ कधी – सायंकाळी ६.३० ते रात्री ९
’ कुठे – विविआना मॉल, ठाणे (प.)

मराठी गाण्यांची मैफल
मराठी भाषा दिनानिमित्त सिद्धकला या संस्थेच्या वतीने रविवार, २८ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता सहयोग मंदिर, घंटाळी, ठाणे (प.) येथे संध्याकाळी सहा वाजता मराठी गाण्यांची विशेष मैफल आयोजित करण्यात आली आहे. मराठी भावसंगीत समृद्ध करणाऱ्या कवयित्री शांता शेळके आणि कविवर्य मंगेश पाडगावकर यांना आदरांजली म्हणून आयोजित या कार्यक्रमात प्रभंजन मराठे, रमेश राणे, अर्चना दामले आणि संपदा गोस्वामी या दोघा शब्दप्रभूंच्या सदाबहार रचना सादर करतील. संकल्पना डॉ. किशोर भिसे यांची असून सुभाष मालेगावकर संगीत संयोजक आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र बेडेकर करणार आहेत.
’ कधी- रविवार, २८ फेब्रुवारी, संध्याकाळी सहा वाजता
’ कुठे- सहयोग मंदिर, घंटाळी, ठाणे (प)

फळाफुलांच्या दुनियेत
निसर्गाच्या सान्निध्यात प्रत्येकालाच जावेसे वाटत असते. धकाधकीच्या या जीवनात प्रत्यक्षात अशा सुंदर ठिकाणी, रम्य स्थळी जाणे शक्य होत नाही. पर्यावरण प्रेमींसाठी एक अनोखी पर्वणी या विकेण्डला उपलब्ध आहे. बृहन्मुंबई वृक्ष प्राधिकरण समितीमार्फत झाडे, फळे व फुलांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. २७ व २८ फेब्रुवारी रोजी मुलुंड पूर्व येथील चिंतामणराव देशमुख उद्यानात हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या ठिकाणी पर्यावरण प्रेमींना अनेक झाडे, फळझाडे, फुलझाडे व औषधी वनस्पती पाहण्यास मिळणार असून त्यांची संपूर्ण माहितीही मिळणार आहे. हे प्रदर्शन विनामूल्य आहे.
’ कधी : २७ व २८ फेब्रुवारी, वेळ : सकाळी ९ ते रात्री ८ वाजता
’ कुठे : चिंतामणराव देशमुख उद्यान, मुलुंड (पू.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2016 3:56 am

Web Title: musical concert and cultural programme in thane
Next Stories
1 खेळ मैदान : मुंबई क्रि केट अकादमी संघ विजयी
2 फेर‘फटका’ : नाटय़ संमेलन शहरापुरतेच मर्यादित!
3 विकास योजनांसाठी भरघोस तरतूद
Just Now!
X