12 December 2017

News Flash

शहरबात : भुयाराचे रहस्य व अफवा!

वसईचा किल्ला म्हणजे मराठय़ांच्या शौर्याचे प्रतीक असून वसईकरांच्या मनात त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

वैष्णवी राऊत | Updated: March 21, 2017 2:44 AM

वसई किल्ल्यातील भुयार थेट भाईंदरमार्गे घोडबंदरला आणि इतर काही ठिकाणी निघते, अशा अफवांनी समाजमाध्यमांवर गेल्या काही दिवसांपासून एकच गोंधळ उडवला आहे

वसई किल्ल्यात असणारे भुयार म्हणजे या किल्ल्याची शान! दरवर्षी काही संघटनांकडून दुर्गप्रेमींना या भुयाराची सफर घडवून आणले जाते. यंदा या सफरीची छायाचित्रे प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाली आणि या भुयाराबाबत अफवा पसरल्या. हे भुयार थेट घोडबंदर किल्ल्यावर निघते, तसेच वसईतील अर्नाळा किल्ला व गिरिज हिरा डोंगरातील दत्त मंदिराजवळ या भुयाराचे इतर मार्ग जात असल्याचेही सांगण्यात आले. मात्र ती केवळ अफवा असल्याचे इतिहास अभ्यासकांकडून सांगण्यात आले.

ऐतिहासिक वसई किल्ल्यातील भुयार थेट भाईंदरमार्गे घोडबंदरला आणि इतर काही ठिकाणी निघते, अशा अफवांनी समाजमाध्यमांवर गेल्या काही दिवसांपासून एकच गोंधळ उडवला आहे. मात्र इतिहास अभ्यासकांनुसार ही निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वसईचा किल्ला म्हणजे मराठय़ांच्या शौर्याचे प्रतीक असून वसईकरांच्या मनात त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नरवीर चिमाजी अप्पा पेशव्यांनी वसईला पोर्तुगीजांच्या जाचातून सोडवले या गोष्टीला तब्बल २७८ वर्षे पूर्ण झाली आहेत. या वसई किल्ल्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे किल्ला भ्रमंती करताना वसई किल्ल्यातील आकर्षण म्हणजे भुयार. वसईतील अनेक सामाजिक संस्था, दुर्ग संस्था भुयार मोहीम आयोजित करतात. अशीच एका समूहाने भुयारी मार्ग भ्रमंती आयोजित केली असता त्यास शेकडो संख्येने दुर्गप्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिला. मोहीम इतकी गाजली की भुयाराची छायाचित्रे महाराष्ट्रभर पोहोचली. या भुयाराच्या छायाचित्रांचा वापर करून काही समाजकंटकांनी हे शिवकालीन भुयार असून वसई किल्ल्यातून भाईंदरमार्गे घोडबंदरला निघते, तसेच वसईतील अर्नाळा किल्ला व गिरिज हिरा डोंगरातील दत्त मंदिराजवळ या भुयाराचे इतर मार्ग जात असल्याचेही सांगण्यात आले. समाजमाध्यमावरील या माहितीद्वारे अनेक दुर्गप्रेमी व पर्यटकांनी भुयार पाहायला किल्ल्यावर धाव घेतल्यावर ही अफवा असल्याचे समोर आले. इतिहास अभ्यासकांनीही निव्वळ अफवा असल्याचे पुरावे नागरिकांसमोर मांडले.

५५३ फूट लांबीच्या या भुयारात काळोख असून साप, विंचू यांसारखे प्राणी आढळतात. त्यामुळे त्यामध्ये फारसे कुणी जात नाही. हा भुयारी मार्ग धोकादायक असून बांधकाम सध्या मोडकळीस आले आहे. त्यामुळे पुरातत्त्व विभागाने याकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे आणि भुयारातील धोका लक्षात घेऊन परवानगीशिवाय तिथे कुणालाही प्रवेश देऊ नये.

भुयार कुठे आहे?

संत सॅबेस्टियन बुरुज किंवा यशवंत बुरुज जिथे कप्तानाचे निवासस्थान होते, तिथे हे भुयार आहे. या भुयाराला ‘१ अ’  व ‘१ ब’ असे दोन प्रवेशद्वार आहेत आणि  ‘२ अ’ , ‘२ ब’ असे दोन बाहेर पडायचे मार्ग आहेत. ‘२ अ’  व ‘२ ब’ यामध्ये ५३० फुटाचे भुयार आहे . पोर्तुगीजांनी १६ व्या शतकात याची बांधणी केली असून १९९५ पासून लाखो दुर्गप्रेमी व विविध संस्थांच्या माध्यमातून दुर्गप्रेमींनी भेट दिली आहे.

भुयारी मार्गातील प्रवास

हा भुयारी मार्ग ५५३ फूट लांबीचा असून बुरुजाच्या वळणानुसार त्यालाही वळण देण्यात आलेली आहेत. भुयारात शिरताना ज्या दरवाजात आपण उभे आहोत, तिथे पूर्वी जिना असावा. पण सध्या तो दगडी जिना काढण्यात आला आहे. खोली जास्त नसल्याने सावधगिरी बाळगून काही लोकांना इथे उडय़ा मारून उतरणे शक्य आहे. परंतु काहींना शिडीचा आधार घेऊनच उतरले पाहिजे. भुयारात जाताना आपल्या हातात काठी, रस्सी, बॅटरी, कंदील, मेणबत्त्या अथवा मशाल यातील काही तरी बाळगल्याशिवाय पुढे जाणे योग्य नाही. खाली उतरून डावीकडे वळताच लांबलचक उतरणीवर सर्वप्रथम दगडांचा एक ढिगारा मार्गात आडवा येतो. ढिगारा ओलांडून पुढे मार्गक्रमण करावे आणि ओणव्यानेच पुढे चालत जावे लागते. नाही तर डोके छताला आदळण्याचा संभव असतो. ही उतरण जमिनीच्या सपाटीवर आणून सोडते. ओणव्याने चालून गेल्यावर पुढे वळण घेत पायावर वाकून रांगत पुढे जावे लागते. या भुयारात हवेची सोय व्हावी म्हणून बुरुजाच्या वरून आतमध्ये घडीव दगडांचे जसे उभे झरोके तयार केले आहेत, तसेच एका जाडजूड भिंतीतून घडीव दगडांची खास रचना करून एक आडवा झरोकाही या जागेवर आणून सोडला आहे.

First Published on March 21, 2017 2:44 am

Web Title: mystery and rumors about the vasai fort underground tunnel