विरारमधील रुळावर आढळलेल्या दोन मृतदेहांचे गूढ कायम
विरारजवळील रेल्वे रुळावर सापडलेल्या दोन विद्यार्थ्यांच्या मृतदेहांचे गूढ आता आणखी गहिरे झाले आहे. हे दोघेही रेल्वेतून पडून मृत्युमुखी पडले असल्याचा दावा पोलीस करत असले तरी पंचनाम्यानुसार दोघांच्या मृत्युवेळेत सुमारे ४० मिनिटांचे अंतर आढळले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. पश्चिम रेल्वेचे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
विरार येथे राहणारे जितेन यादव (१६) आणि विकी झा (१६) या दोन विद्यार्थ्यांचे मृतदेह रविवारी रात्री विरारनजीकच्या नारिंगी फाटा येथे सापडले होते. दोघांचा ट्रेनमध्ये पडून मृत्यू झाल्याचे सुरुवातीला रेल्वे पोलिसांनी सांगून अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता. परंतु या मृत्यूबाबत कुटुंबीयांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करून दोघांची हत्या झाल्याचा आरोप केला होता. विकी भाईंदर येथे मित्राच्या वाढदिवस पार्टीसाठी जातो असे सांगून घरातून निघाला होता. जाताना त्याने आईकडून ५० रुपये घेतले होते, तर जितेन मित्राकडे वही आणण्यासाठी जातो असे सांगून घरातून बाहेर गेला होता. रात्री बराच वेळ दोघे घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली होती. मात्र त्यांचे मृतदेह वैतरणा स्थानकापासूनच्या काही अंतरावर नारिंगी फाटय़ाजवळ सापडले होते. हे दोघे रेल्वेगाडीतून पडले असते तर त्याचे मृतदेह वेगवेगळ्या बाजूला कसे सापडले, असा सवाल कुटुंबीयांनी केला आहे. तसेच या दोघांच्या शरीरावर आढळलेल्या जखमा शस्त्राच्या वाराने झाल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे. ते जर भाईंदरला गेले तर मग तेथून विरारला यायला हवे होते. विरारच्या पुढे ते गेलेच का, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. हे दोघे केळवा येथे गेले होते असे लिहून देण्यास पोलिसांनी भाग पाडले असा आरोप मयत जितेनची बहीण श्वेताने केला आहे.
विशेष म्हणजे, रेल्वे पोलिसांनी पंचनाम्यात केलेल्या नोंदीनुसार विकी ७ वाजून १० मिनिटांनी विरार वैतरणादरम्यान पडून मरण पावल्याची नोंद आहे आणि जितेन ७ वाजून ५० मिनिटांनी अज्ञात गाडीतून पडून मरण पावल्याची नोंद आहे.दोघांचा एकत्र अपघात झाला तर दोघांच्या मृत्यूत ४० मिनिटांची तफावत का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दरम्यान, ‘या प्रकरणाची सर्व चौकशी करण्याचे आदेश मी वसई रेल्वे पोलिसांना दिले आहेत तर मी स्वत: त्यावर लक्ष ठेवणार आहे,’ असे पश्चिम रेल्वेचे उपायुक्त दीपक देवराज यांनी सांगितले.