tv05पण घेणारी व्यक्ती ‘नको रे बाबा एवढं आयुष्य’ म्हणत नन्नाचा पाढा गिरवते. पण डॉ. मानसी महेश जोशी मात्र याला अपवाद आहेत. ‘मला हवंच आहे भरपूर आयुष्य’ अशी अवखळ, लोभस प्रतिक्रिया त्या व्यक्त करतात.
डॉ. मानसी जोशी यांच्या प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे रहस्य त्यांना लाभलेल्या माहेरच्या ‘हिरव्या’ श्रीमंतीत आहे. चांदीबाई कॉलेजमध्ये असताना वनस्पती निरीक्षणाच्या निमित्ताने गोवा, दार्जिलिंग अशा मुक्त भटकंतीने हिरवा रंग गडद होऊ लागला आणि मोठय़ा वृक्षांनी मानसीताईंच्या मनात घर केले. शाळेतील पुन्नम्मा टीचर कॉलेजमधील डॉ. शिंपी, मामी डॉ. अवंती दामले यांच्या ‘डॉक्टर’ या पदवीने मानसीताईंना प्रभावित केले आणि ‘मीसुद्धा डॉक्टरेट करणारच’ असा त्यांनी निश्चय केला.
डॉक्टरेटच्या या ध्येयासाठी स्वत: झोकून देतानाच मानसीताईंचा नाटय़स्पर्धा, स्थानिक गणेशोत्सव यांतील सहभाग थांबला नाही. याच काळात एनसीसीचे तीन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण करून त्या ‘सी’ प्रमाणपत्र परीक्षाही उत्तीर्ण झाल्या. रॉयल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समधून एम.एस्सी. इकॉलॉजी करीत असताना महेश जोशी हे त्यांचे सहाध्यायी होते. निसर्गावर प्रेम करता करता हे दोघे एकमेकांच्याही प्रेमात पडले आणि मानसीताई जोशी कुटुंबांच्या सून झाल्या. ठाण्यातील चरई येथील त्यांच्या सासरच्या घराची बाग पानाफुलांनी नटलेली होती. चुलत सासरे तर अनेक वेळा नवीन झाड दिसलं की विकत घेऊन यायचे. ‘झाडांच्या खुणांच्या’ आधारे ठाण्यातला परिसर ओळखीचा होऊ लागला. जरा ठाण्यात स्थिरस्थावर झाल्यावर मनात घर केलेले वृक्ष साद घालू लागले आणि झाडांवरच पीएच. डी. करण्याचा निर्णय पक्का झाला. या निर्णयाला सासू-सासऱ्यांनी प्रोत्साहन दिले. वनस्पतीतज्ज्ञ डॉ. मारसेलीन अल्मेडा यांची त्यांनी भेट घेतली. अल्मेडा यांनीही फार आढेवेढे न घेता त्यांना मार्गदर्शन करण्याचे कबूल केले. ‘अ‍ॅबरेरियल फ्लोरा ऑफ ठाणे म्युनिसिपल कॉपरेरेशन एरिया’ हा विषय ठरला.
 मुंबईकडे मुलुंड चेकनाका, घोडबंदर रोडवर गायमुखापर्यंत नवी मुंबई विटाव्यापर्यंत, ठाणे सिटी, शीळफाटय़ापर्यंत, मुंब्रा, दिवा पारसिकचा डोंगर, येऊर जंगल, पाटोणी पाडय़ापर्यंत पाऊलवाटेच्या एक मीटर आतपर्यंत अशी हद्द निश्चित करण्यात आली. कॅमेरा, वही, पेन, डबा अशा तयारीने पदभ्रमणाला सुरुवात झाली. तिन्ही ऋतूंमध्ये झाडे बघायची. त्याचे खोड, बुंधा, काटे असल्यास काटे, फांद्या, पाने, फुले, फळे, कॅनोपी असे निरीक्षण करून फोटो काढायचे. येताना सर्व नमुने घरी आणायचे. ओळखीवर शिक्कामोर्तब करायचे. सेंट झेवियर्सच्या लायब्ररीमधील अनेक संदर्भग्रंथ मदतीला धावून यायचे. घरी आल्यावर झाडांचे ‘अलंकार’ वर्तमानपत्रात घालून ठेवायचे. बुरशी येऊ नये म्हणून दोन-चार वेळेला वर्तमानपत्र बदलायचे. असे घरी गेल्यावर सोपस्कार असायचे. येऊरला एखाद्या अनोळखी झाडाची एखादी कळी उमललेली बघण्यासाठी पाच-सहा दिवस रोज जावे लागे. कोपरी इथल्या एका झाडाच्या लालचुटूक पानांनी लवकर ओळखीचे हास्य केले नाही. ५ ते १० मीटर उंची आणि माशीएवढे फूल असलेल्या त्या झाडाने ‘ओळखा पाहू’ म्हणत सगळ्यांना शोधाशोधीला जुंपले. ‘लॉट आला तो लावला’ असे वन व्यवस्थापनाने भाष्य केले. अखेर त्या परदेशी आफ्रिकन झाडाचे ‘खाया’ असे बारसे झाले. ठाण्यात आता खूप ‘खायाची’ झाडे आहेत.
जवळजवळ अडीचशे वृक्षांचे नमुने मानसीताईंनी गोळा केले. या विषयाचा अभ्यास फक्त घरात किंवा वाचनालयात बसून करणे शक्य नव्हते. उन्हातान्हात, पावसात फिरावे लागे. जवळजवळ पाच-सहा वर्षे त्या ‘हिरव्या’ वाटा धुंडाळत राहिल्या. फक्त मातृत्वाची नवीन भूमिका अनुभवण्यासाठी १०-११ महिन्यांची विश्रांती मध्ये घेतली. आई-वडील, सासू-सासरे आणि अल्मेडा पती-पत्नी या तीन आई-वडिलांच्या जोडय़ा, चुलत सासरे, बहीण अनिता गोखले, पती महेश यांच्या सहकार्यामुळे डॉक्टरेटचे स्वप्न पुरे झाले. एका स्त्रीच्या यशाच्या मागे संपूर्ण कुटुंब ठामपणे उभे होते, हे मानसीताई अभिमानाने सांगतात.
वृक्षांच्या बुंध्याचे ‘ट्रेसिंग’ करून म्हणजे कृत्रिम उपायाने वृक्ष ओळखणे, जे अजूनपर्यंत कोणी केले नव्हते, हे मानसीताईंच्या प्रकल्पाचे वैशिष्टय़. पीएच. डी. झाल्यावर अनेकांनी आता कॉलेजात प्राध्यापकाची नोकरी करणार ना, असा सवाल विचारलाच जायचा, पण नोकरीत न अडकता मानसीताईंनी पर्यावरण दक्षता मंचाकडे मोर्चा वळवला. पर्यावरण शाळा, नंदनवन. सुंदर घरगुती बाग स्पर्धा, ग्रीन लव्हर्स क्लब या मंचाच्या उपक्रमांमध्ये त्यांचा पुढाकार आहे, तसेच शिक्षण क्षेत्रात राहायचे ठरविल्यामुळे प्रौढ साक्षरता, होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेच्या विद्यार्थ्यांना प्रकल्पात मार्गदर्शन करणे, दहावीच्या गरजू विद्यार्थ्यांना विज्ञान विषयात मार्गदर्शन करणे, यात त्यांनी स्वत:ला गुंतून घेतले आहे.
या हिरव्या पसाऱ्यात गुंतूनसुद्धा दीपक ज्योती महिला सहकारी पतपेढीच्या संचालिका हे पद त्या गेली पंधरा वर्षे समर्थपणे सांभाळत आहेत. फुले व पाने दोन्ही प्रिय असल्यामुळे वेगवेगळ्या फ्लॉवरशोजमध्ये भाग घेऊन इकेबाना, वेस्टर्न स्टाइल, फ्री स्टाइल, अशा पानाफुलांच्या आकर्षक रचना करून अनेक (पोतंभर) बक्षिसे मिळवली आहेत. भ्रमंतीतून निसर्गाचे अफाट विश्व ओळखीचे करून घेणे हा त्यांचा खूप आवडीचा विषय आहे. ‘अजून खूप काही करायचं आहे’ असे त्या सांगत असतात. ‘आत आपुल्या झरा झुळझुळे निळा निळा स्वच्छंद जगणे म्हणजे उधळत जाणे हृदयातील आनंद’ हे मनी ‘मानसी’ गुंजत आहे हेच खरे!
सुचित्रा साठे