उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांच्या साठय़ासह सापडलेल्या मोटारीचे मालक मनसुख हिरेन यांच्या शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातील निष्कर्षांबाबत ठाणे पोलिसांनी मौन बाळगल्याने मृत्यूचे गूढ कायम आहे.

कलिना येथील प्रयोगशाळेत पाठविलेल्या विसेरा अहवालातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाल्यानंतरच ते जाहीर करण्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचे गूढ उलगडण्यासाठी आणखी १५ दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागण्याची शक्यता पोलीस वर्तवत आहेत.

मुंबई पोलीस मनसुख यांची चौकशी करीत होते. ती सुरू असतानाच शुक्रवारी ठाणे पोलिसांना त्यांचा मृतदेह मुंब्रा खाडीत आढळला होता. त्यानंतर त्यांच्या पत्नी विमल यांनी, मनसुख आत्महत्या करूच शकत नाहीत, अशी प्रतिक्रिया माध्यमांकडे व्यक्त केली होती. तर, हा घातपाताचा प्रकार असल्याचा दावा त्यांच्या निकटवर्तीयांनी केला होता.

कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये शुक्रवारी मनसुख यांच्या मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले. मात्र, शनिवारी रात्री उशिरापर्यंत ठाणे पोलिसांनी शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालाबाबत मौन बाळगले होते. संवेदनशील प्रकरण असल्यामुळे पोलिसांनी त्यांचा विसेरा कलिना येथील प्रयोगशाळेत पाठविला आहे.

दरम्यान, भाजपचे आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे आणि मंगलप्रभात लोढा यांनी शनिवारी मनसुख यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.  मनसुख यांचे कुटुंबीय शनिवारी सकाळी मनसुख यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत होते. हा घातपात असून मनसुख यांच्या मृत्यूचे कारण कळल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही. अशी भूमिका त्यांनी घेतली होती. मात्र, पोलिसांच्या विनंतीनंतर मनसुख यांच्या कुटुंबीय मृतदेह ताब्यात घेण्यास तयार झाले. रात्री त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पत्र समाजमाध्यमावर प्रसारित

मनसुख यांची चौकशी सुरू असताना त्यांनी २ मार्चला लिहिलेले एक पत्र समाजमाध्यमावर प्रसारित झाले आहे. त्यामध्ये त्यांनी पोलिसांच्या विविध तपास यंत्रणांमुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक त्रास होत असल्याचे म्हटले आहे. तसेच या पत्राच्या प्रती मुख्यमंत्री कार्यालय, मुंबई आणि ठाणे पोलिसांना दिल्याचे म्हटले जात आहे. मात्र, या पत्राबाबत ठाणे पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.

मनसुख यांचा शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल अद्याप मिळालेला नाही. प्रकरण संवेदनशील असल्यामुळे मनसुख यांचा विसेरा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. त्यासाठी १५ दिवसांहून अधिक कालावधी लागण्याची शक्यता आहे.

– संजय येनपुरे, ठाणे अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा)