किशोर कोकणे

जप्त केलेले रक्तचंदन नसल्याचा आरोपींच्या वकिलांचा दावा

नवी मुंबई येथील एपीएमसी बाजार परिसरात हस्तगत करण्यात आलेला रक्तचंदनाचा साठा मुळात रक्तचंदनाचा नसल्याचा दावा करत संशयित आरोपींच्या वकिलांनी वाशी न्यायालयात आव्हान अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे ठाणे वन विभागाने हे रक्तचंदन तपासणीसाठी ते प्रयोगशाळेत पाठविले आहे. हे रक्तचंदन नसल्याचे स्पष्ट झाल्यास केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणा आणि वन विभागाच्या तपास यंत्रणेविषयी आणि अटकेच्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह उभे रहाण्याची शक्यता आहे.

नवी मुंबई येथील एपीएमसी मार्केट परिसरात सुमारे सहा महिन्यांपूर्वी केंद्रीय महसूल गुप्तचर संचनालयाने मोठय़ा प्रमाणात रक्तचंदन जप्त केल्याचा दावा केला होता. ही कारवाई केल्यानंतर संशयीत आरोपींचे जबाब नोंदवून त्यांना सोडून देण्यात आले होते. तब्बल सहा महिन्यांनंतर म्हणजेच, एप्रिलमध्ये या कारवाईची माहिती केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाने ठाणे वन विभागाला दिली होती. त्यामुळे महसूल गुप्तचर संचनालयाची ही कारवाई वादात सापडली होती. वेळेवर माहिती न मिळाल्याने या प्रकरणातील सातपैकी चार आरोपी फरार आहेत. त्यांचा तपास सध्या ठाणे वन विभागाकडून सुरू आहे.

असे असताना जो साठा रक्तचंदनाचा आहे असा दावा तपास यंत्रणा करत आहे, त्यावर प्रश्न उपस्थित करत संशयित आरोपींचे वकील विकास जोशी आणि मयूर कुटे यांनी वाशी न्यायालयात दावा दाखल केला आहे. जप्त केलेला मुद्देमाल रक्तचंदन आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी ठाणे वन विभागाने ते प्रयोगशाळेत पाठवले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. हा अहवाल येण्यासाठी महिन्याभराचा कालावधी जाणार असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. जर अहवाल रक्तचंदन नसल्याचा निघाला तर, वन विभाग आणि महसूल गुप्तचर संचालनालयाची कारवाईच चुकीची ठरण्याची शक्यता आहे, असे आरोपींचे वकील अ‍ॅड्. सागर कदम यांनी सांगितले.

आरोपींना जामीन

महसूल गुप्तचर संचनालयाने तिघांना वन विभागाच्या ताब्यात दिले होते. ठाणे वन विभागाने गुन्हा दाखल करून आरोपींना अटकही केली होती. मंगळवारी वाशी न्यायालयाने त्यांना प्रत्येकी ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर व देश सोडून न जाण्याच्या अटीवर सोडल्याची माहिती वकील सागर कदम यांनी दिली.