जमीन मोबदल्यासह दरवर्षी ठराविक रक्कम देणार; राज्य सरकारचा निर्णय
* सुमारे ७४४ किमीचा मुंबई-नागपूर आठपदरी हा महामार्ग
* या महामार्गासाठी सहा हजार हेक्टर जमीन संपादित करणार
* प्रकल्पासाठी सुमारे ३० हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
मुंबई आणि नागपूर या दोन्ही शहरातील दळणवळणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असलेला आणि राज्यातील २६ जिल्ह्य़ांना एकाच वेळी जोडणाऱ्या ‘मुंबई-नागपूर’ या सुपर महामार्गासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना प्रकल्पात थेट भागीदार म्हणून घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना जमिनीच्या मोबदल्यासह शेती उत्पादनाच्या आधारावर दरवर्षी ठरावीक रक्कम दिली जाणार असून शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना दिली.
‘मुंबई-नागपूर’ या सुपर महामार्गाच्या कामासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गुरुवारी मंत्रालयात एक बैठक झाली असून या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना प्रकल्पात भागीदार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचे संपूर्ण काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ करणार आहे.
मुंबई-नागपूर हे अंतर पार करण्यासाठी दहा ते बारा तासांचा अवधी लागतो, मात्र या महामार्गामुळे हे अंतर केवळ पाच ते सहा तासांवर येणार आहे. तसेच या महामार्गाच्या माध्यमातून २ हा प्रकल्प आशिया खंडातील सर्वात मोठा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरणार आहे, अशी माहिती शिंदे यांनी दिली. या प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला दिला जाईल आणि त्याशिवाय त्यांच्या शेतीतील उत्पन्नाच्या आधारे दरवर्षी ठरावीक रक्कम देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीतून किती उत्पन्न मिळते, त्याची मोजदाद करून त्याप्रमाणे ही रक्कम देण्यात येणार आहे. याशिवाय त्यांना रोजगाराची संधीही उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे प्रकल्पात भागीदारी करून घेण्याचा निर्णय शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असेही त्यांनी सांगितले. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सल्लागार नेमण्यात आले आले. तसेच प्रकल्पासाठी सर्वेक्षणाचे कामही लवकरच सुरू होणार असून येत्या तीन वर्षांत म्हणजेच २०१९ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल, असा दावाही त्यांनी या वेळी केला.
ठाणे ते बोरिवली भुयारी मार्ग
ठाणे ते बोरिवली या भुयारी मार्गाच्या कामाला वेग आला असून त्यासाठी सल्लागार नेमण्यात आला आहे. तसेच या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. तसेच घोडबंदर महामार्गावरील कोंडी कमी करण्यासाठी गायमुख ते वर्सोवापर्यंत उड्डाणपूल उभारण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. त्याचप्रमाणे कल्याण ते शिळफाटा या २१ किमीच्या उड्डाणपूल उभारण्याच्या कामातील अडचणी दूर झाल्या असून हा प्रकल्प लवकरच मार्गी लागेल, असेही त्यांनी सांगितले.