27 May 2020

News Flash

पुलांच्या बांधकामांना करोनाची बाधा

नायगाव आणि सोपारा खाडीपुलाचे काम रखडले

नायगाव आणि सोपारा खाडीपुलाचे काम रखडले

मिल्टन सौदिया, लोकसत्ता

वसई :  वसईतील नायगाव रेल्वे स्थानकाच्या पूर्व-पश्चिमेला जोडणारा उड्डाणपूल आणि सोपारा खाडीपुलाच्या कामाला करोनाच्या संकटामुळे पुन्हा खीळ बसली आहे.  सर्वसामान्यांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या या दोन विकास प्रकल्पांच्या पूर्णतेबाबत आता अनिश्चितता निर्माण झाली असून करोनाचे सावट दूर झाल्यानंतरही नागरिकांना कित्येक महिने या पुलांची प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

नायगाव रेल्वे स्थानकावर उड्डाणपूल नसल्याने पूर्व आणि पश्चिमेकडील गावांना ये-जा करण्यासाठी तब्बल २५ किलोमीटरचा वळसा घालावा लागत आहे. यावर उपाय म्हणून नायगाव लोहमार्गावर पूर्व-पश्चिम जोडणारा उड्डाणपूल असावा, अशी मागणी वसई-विरारचे रहिवासी अनेक वर्षांपासून करत होते. अनेक अडथळ्यांनंतर मंजुरी मिळालेल्या या पुलाचे काम २०१५ मध्ये सुरू करण्यात आले. हा उड्डाणपूल झाल्यास वसई-मुंबई हे अंतर २५ किलोमीटरने कमी होणार आहे. मात्र करोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात टाळेबंदी लागू केल्यानंतर  पुलाचे काम पूर्णत: ठप्प पडले आहे.

हीच गत नायगाव रेल्वे स्थानक आणि पूर्वेकडील जूचंद्र यांना जोडणाऱ्या सोपारा खाडीपुलाची झाली आहे. या पुलाच्या बांधकामातही आतापर्यंत अनेक अडचणी झाल्यामुळे आधीच या पुलाचे बांधकाम रखडले आहे. ते काम त्वरेने पूर्ण व्हावे, यासाठी मध्यंतरी राजकीय पक्षांनी आंदोलनेही केली होती. मागील सहा वर्षांपासून या पुलाचे काम सुरू आहे. हा पूल मे २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासनही सार्वजनिक बांधकाम खात्याने दिले होते.  अजूनपर्यंत हा पूल अर्धवट अवस्थेत आहे. जुना लोखंडी पूल धोकादायक स्थितीत असल्यामुळे या पुलावरील ये-जा बंद करण्यात आल्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ  नये यासाठी अर्धवट अवस्थेतील सोपारा खाडीपुलावरून ये-जा करण्यास नागरिकांना मुभा देण्यात आल्याचे दिसून येते.  देशभरात टाळेबंदी जारी करण्यात आल्यामुळे या पुलाचे बांधकामही रखडले आहे.

या दोन्ही पुलांचे काम अजून दोन महिने बंद राहिले तर पावसाळ्यानंतरच कामांना सुरुवात होऊन दोन्ही पूल पूर्ण होण्यास २०२१ वर्ष उजाडेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहेत.

सोपारा खाडीपुलाचे पूर्वेकडील काम ८० टक्के पूर्ण झाले होते. पश्चिमेकडील कामालाही गती मिळाली होती, पण करोनाचे संकट आल्यामुळे हे सर्व काम रखडले आहे.

पी. आर. चव्हाण, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

दोन्ही पुलांची कामे यापूर्वीच पूर्ण व्हायला हवी होती. करोनाआधी प्रशासकीय अनास्था आणि दिरंगाई यामुळे पुलांच्या बांधकामांस विलंब झाला.      

मनोहर गुप्ता, सामाजिक कार्यकर्ता

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2020 2:21 am

Web Title: naigaon and nalasopara creek bridge work stopped due to coronavirus infection zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 “कोणीही जास्त शहाणपणा करु नका, आम्हाला हौस नाही”, बाहेर फिरणाऱ्यांवर जितेंद्र आव्हाड संतापले
2 दुर्दैवी: करोनाची लागण झालेल्या नऊ महिन्याच्या गर्भवती महिलेचा मृत्यू
3 भिवंडी, मुंब्य्रावर ड्रोनची नजर
Just Now!
X