गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या नायगाव खाडीवरील पादचारी पूल शुक्रवारी अर्धवट अवस्थेत नागरिकांसाठी खुला करण्यात आला. पुलाच्या पोहोचमार्गासाठी खारभूमी विभागाची परवानगी मिळालेली नसल्याने वाहनांसाठी तूर्तास हा पूल बंदच राहणार आहे. पादचारी पुलाची उंची जास्त असल्याने ज्येष्ठ नागरिक व गर्भवती महिलांना जाण्यासाठी त्रास होण्याची शक्यता आहे.

नायगाव-सोपारा खाडीवरील नवीन पुलाचे काम अनेक वर्षांपासून रखडले होते. त्यामुळे नागरिकांना धोकादायक पुलावरून प्रवास करावा लागत होता. जुन्या पुलाची अवस्था जर्जर झाल्याने २०१४ पासून नवीन पुलाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली होती, परंतु अनेक अडचणी आल्यामुळे पुलाचे काम लांबणीवर पडत गेले. त्यासाठी शिवसेनेने नुकतेच आंदोलनही केले होते.

पादचारी पुलाच्या दोन्ही बाजूंस उतार पोहोचमार्ग देऊन हलक्या वाहनांना पूल खुला होणार होता. मात्र त्या पोहोचमार्गासाठी खार विभागाची परवानगी न मिळाल्याने ते काम होऊ  शकले नाही, तरी सार्वजनिक बांधकाम खात्याने अर्धवट अवस्थेतील हा पूल शुक्रवारी नागरिकांसाठी खुला केला. शुक्रवारी सकाळी पूल खुला होताच. नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मात्र नवीन पादचारी पुलाची उंची जास्त असल्याने ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांना जाण्यासाठी त्रास व्हायचा. त्यासाठी लवकरात लवकर दोन्ही बाजूंनी पोहचमार्ग झाला तरच नागरिकांचा प्रवास सुखकर होईल, असे नागरिकांनी सांगितले. परवानगी मिळाल्यानंतर पोहोचमार्ग तयार करण्याची पुढील प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल, असे सार्वजनिक बांधकाम खात्याने सांगितले.

नवीन पादचारी पूल उपयुक्त आहे. मात्र ज्येष्ठ नागरिकांना त्याचा थोडा त्रास होईल, पण जर उतारमार्गाचे काम पूर्ण झाले तर येण्या-जाण्यासाठी चांगली सुविधा होईल.

– नीलकंठ पाटील, स्थानिक रहिवासी