मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या मुख्यालयातील यंत्रणेला जाग

लोकसत्ता वार्ताहर

भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या मुख्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याकरिता झाडांना मारण्यात आलेले खिळे काढण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिल्यामुळे पर्यावरणप्रेमी वर्गाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. त्याच प्रकारे इतर भागातील झाडांवरील खिळे काढण्यात यावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे.

मीरा-भाईंदर  महानगरपालिका क्षेत्रात २ लाखांहून अधिक झाडे आहेत. पालिकेने ही झाडे लागवड करून जतन केलेली आहेत. या झाडांमुळे शहराची शोभा वाढवून ते पर्यावरणाच्या रक्षणात मोठी भूमिका बजावत असतात. मात्र अनेक वेळा या झाडांची योग्य निघा राखली जात नसल्यामुळे ही  झाडे मृत्यू पावत असून त्यांच्या संख्येत घट होत आहे. अशीच परिस्थिती मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या मुख्यालयात निर्माण झाली होती. प्रशासनाकडून मुख्यालयाच्या आवारात नियंत्रण ठेवण्याकरिता सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.परंतु या कॅमेऱ्यांना लावण्याकरिता योग्य जागा मिळत नसल्यामुळे ते चक्क झाडांवरच खिळे ठोकून लावण्यात आले होते. त्यामुळे झाडाचा मृत्यू होण्याची शक्यता अधिक निर्माण झाली होती.

या संदर्भात लोकसत्ता वृत्तपत्रात मंगळवारी बातमी प्रकाशित करण्यात आली होती. त्या बातमीची दखल घेत बुधवारी संध्याकाळच्या सुमारास झाडावरील कॅमेरे आणि खिळे काढण्याचे काम करण्यात आले. तसेच आयुक्तांच्या आदेशानुसार कॅमेरे काढण्यात येत असल्याची माहिती कामगारांनी दिली.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या आवारातील झाडांना खिळे ठोकून लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे बुधवारी महापालिकेच्या संबंधित यंत्रणेने काढले आहेत.