मीरा रोड पूर्व परिसरातील नागरिक संतप्त

लोकसत्ता वार्ताहर

भाईंदर : मीरा रोड पूर्व येथील शांती प्लाझा परिसरात करण्यात येत असलेले  नाल्याचे काम अर्थवट अवस्थेत सोडल्याने  प्रवास करणाऱ्या नागरिकांना  जीवाचा धोका निर्माण झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या नाल्याचे काम वारंवार करण्यात येत असल्याची तक्रार स्थानिक  नागरिकांकडून करण्यात येत आहे.

मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फम्त शहरातील रस्ते व नाल्याचे काम करण्यात येते.त्यानुसार मिरा रोडच्या शांती प्लाझा येथील रसाज चौकापासून पाण्याच्या टाकी पर्यंत नाला निर्मितीचे काम करण्यात येत आहे. याकरिता पालिका प्रशासनाचे १ करोड ७८ लाख रुपये खर्च करण्यात आले आहे.मात्र तरी देखील गेल्या दोन महिन्यापासून हे काम बंद असल्यामुळे स्थानिक नागरिकांना अनेक प्रश्न पडले आहे.

शांती प्लाझा परिसरात नागरी लोकवस्ती आहे.तसेच या भागात शाळा, रुग्णालय, आणि बाजार असल्यामुळे नागरिकांची सतत रहदारी या ठिकाणी सुरु असते.अश्या परिस्थितीत देखील  येथे नाल्याचे काम अर्थवट अवस्थेत सोडण्यात आले आहे.महत्वाची बाब म्हणजे या अर्थवट सोडलेल्या कामामुळे  कोणत्याही क्षणी दुर्घटना होण्याची भीती निर्माण झाली आहे.शिवाय नाल्यातील पाणी बाहेर येत असल्यामुळे या ठिकाणी पाण्याचे तळे साठून दरुगधीत वाढ झाली आहे.त्यामुळे हे नाल्याचे काम  तात्काळ पुर्ण  मागणी स्थानिक  नागरिकांकडून  पालिका प्रशासनाला करण्यात येत आहे.

या ठिकाणी पूर्वी देखील एका नागरिकाचा मृत्यू झाला होता.मात्र तरी देखील असा नाला उघडा ठेवणे धोकादायक आहे.

लखन छडीवाल, स्थानिक नागरिक

त्या भागात कंत्राटदाराने काम बंद केले होते.त्यामुळे कंत्राटदाराला शेवटची नोटीस बजावण्यात आली आहे.

सचिन पाटील, कनिष्ठ अभियंता (सार्वजनिक बांधकाम विभाग)