रहिवाशांकडून गृहसंस्थेच्या आवारात जागा; विजय नगरातील गुन्हेगारीला आळा बसण्याची अपेक्षा

नालासोपारा पूर्वेला विजयनगरातील रहिवाशांनी स्वत:च्या मालकीच्या जागेत पोलीस चौकी उभारली आहे. एका गृहसंस्थेच्या आवारातील पाण्याची टाक्याची जागा पोलीस चौकीसाठी दिली आहे. बुधवारी या पोलीस चौकीचे उद्घाटन झाले. या चौकीमुळे परिसरातील गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होणार आहे.

नालासोपारा पूर्वेला लोकसंख्येत वाढ झाली आहे. मोठय़ा लोकसंख्येसाठी तुळींज येथे एकमेव पोलीस ठाणे आहे. नालासोपारा पूर्वेचा विजय नगर हा परिसर विकसित होत असलेला भाग आहे. या परिसरात अनेक वर्षांपासून गुन्हेगारी वाढत आहे. याविरोधात नागरिकांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे. लोकांना तक्रारी करण्यासाठी स्थानकाजवळील तुळींज पोलीस ठाण्यात जावे लागत होते. परंतु तेथे अपुरे पोलीस बळ असल्याने ते नियमित विजयनगर वासियांच्या मदतीला येऊ शकत नव्हते. महिला तसेच तरुणींचा विनयभंग झाल्याचा घटना, मारामारी, सोनसाखळी हिसकावण्याच्या घटना, नशेबाजांच्या त्रासामुळे येथील रहिवाशी त्रस्त झाले होते. त्यामुळे या भागात स्वतंत्र पोलीस चौकी असावी अशी मागणी केली जात होती.

परंतु पोलिसांना स्वत:च्या पोलीस ठाण्यासाठी जागा नसल्याने ते चौकीची मागणी पूर्ण करू शकत नव्हते. मागील महिन्यात भरदुपारी पोलिसांची गुंडाबरोबर चकमक झाल्याने येथील नागरिक अधिकच धास्तावले होते. पोलीस जागेअभावी पोलीस चौकी देऊ शकत नसतली तर लोकसहभागातून पोलीस चौकी उभारावी, असे ठरले. विजय नगर येथील जयसंकल्प रहिवाशी सोसायटीने पुढाकार घेतला. ही सोसायटी नाक्यावरच आहे. त्यांनी गृहसंस्थेच्या आवारातील जागा पोलीस चौकीला देऊ  केली. मात्र पोलीस चौकी बांधणार कोण हा प्रश्न होता. स्थानिक नगरसेवक आणि प्रभाग समिती सभापती नीलेश देशमुख यांनी रहिवाशांच्या या प्रयत्नाला हातभार लावत पोलीस चौकी उभारून दिली. बुधवारी स्वातंत्र्य दिनी या पोलीस चौकीचे उद्घाटन करण्यात आले.

लवकरच सीसीटीव्ही

चौकीत पोलीस उपनिरीक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांचा सहभाग असेल. तRारी येथे नोंदविता येणार आहे. या परिसरातच चौकी असल्याने गुन्हेगारांवर अंकुश येऊन नागरिकांना निर्भयपणे वावरता येणार आहे. परिसरातील २५ हजारांहून अधिक कुटुंबांना या चौकीचा फायदा होणार आहे. या ठिकाणी सीसीटीव्हीही लागतील असे प्रभाग समिती सभापती निलेश देशमुख म्हणाले.