18 September 2020

News Flash

जखमी गोविंदा तीन वर्षांनी चालू लागला

नालासोपारा येथे दहीहंडीचा सराव करताना जखमी झालेला प्रवीण रहाटे हा तरुण तीन वर्षांनंतर चालू लागला आहे

डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले असून प्रवीण आता स्वत:च्या पायाने घरात चालू लागला आहे.

नालासोपारा येथे दहीहंडीचा सराव करताना जखमी झालेला प्रवीण रहाटे हा तरुण तीन वर्षांनंतर चालू लागला आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून लवकरच तो पूर्ण बरा होण्याची आशा डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

नालासोपारा येथे राहणारा प्रवीण रहाटे हा नियमित गोविंदा पथकात सहभागी होऊन दहीहंडी फोडायचा. २०१३ मध्ये तुळिंज येथे नऊ  थरांचा सराव करताना त्याचे पथक कोसळले आणि खाली उभा असलेला प्रवीण खाली पडला. त्याच्या कमरेजवळील मणका तुटला आणि तो जायबंदी झाला. त्याच्यावर लिलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र तो अंथरुणालाच खिळला होता.

नालासोपारा येथील कै. रमाकांत वैद्य चॅरिटेबल ट्रस्टने त्याच्या वैद्यकीय उपचारांसाठी त्याला गेल्या वर्षी दत्तक घेतले होते. त्याला उपचार मिळणे सुलभ व्हावे यासाठी स्वतंत्र भाडय़ाची खोली घेऊन देण्यात आली आहे. त्याच्यावर फिजिओथेरेपी सुरू आहे. डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले असून प्रवीण आता स्वत:च्या पायाने घरात चालू लागला आहे. प्रवीण स्वयंपाकी म्हणून काम करीत होता. त्याची नोकरी गेली. त्याचे आई-वडील नसल्याने तो मावशीकडे राहत होता; परंतु बेरोजगारी आणि वैद्यकीय उपचारांचा खर्च यामुळे तो पुरता कोलमडला होता. आता चालू लागल्याने लवकरच बरा होऊन कामाला जाऊ  शकेन याचा आनंद त्याने व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2017 1:02 am

Web Title: nalasopara youth started running after three years who injured in dahi handi
Next Stories
1 मीरा-भाईंदरच्या विकासाचे ‘संकल्पचित्र’
2 भाजप उमेदवाराकडून पैसेवाटप?
3 तुल्यबळाच्या लढाईत ताकद पणाला
Just Now!
X