X
X

नालासोपाऱ्यात विवाहबाह्य संबंधातून हत्या, पत्नीने बेडरुममध्ये झोपलेल्या पतीचा चिरला गळा

नालासोपाऱ्यामध्ये एका महिलेने बुधवारी नवऱ्याची भोसकून हत्या केली.

नालासोपाऱ्यामध्ये राहणाऱ्या एका महिलेने बुधवारी नवऱ्याची भोसकून हत्या केली. पतीने आत्महत्या केली असा महिलेने आधी दावा केला होता. पण नंतर तिने गुन्ह्याची कबुली दिली. सुनील कदम असे मृत व्यक्तीचे नाव असून आई-वडिल, पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. पत्नी प्रणाली (३३) विरोधात कलम ३०२ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास सुनील आणि प्रणालीमध्ये कडाक्याचे भांडण झाले.

त्यानंतर सुनील झोपण्यासाठी तर प्रणाली पाणी पिण्यासाठी म्हणून किचनमध्ये गेली. प्रणाली बेडरुममध्ये आली तेव्हा तिच्या हातात चाकू होता. तिने झोपलेल्या सुनीलला ११ वेळा चाकूने भोसकले नंतर त्याचा गळा चिरला अशी माहिती तुळीज पोलिसांनी दिली.

हत्या केल्यानंतर प्रणालीने हॉलमध्ये येऊन सासू-सासऱ्यांना उठवले व सुनीलने आत्महत्या केल्याचे सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरु केली. मृतदेह पाहिल्यानंतर पोलिसांना संशय आला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून प्रणालीची चौकशी केली. त्यावेळी तिने गुन्हयाची कबुली दिली. सुनीलचे बाहेर विवाहबाह्य संबंध होते. त्यामुळे बदला घेण्याच्या हेतूने आपण हा गुन्हा केल्याचे तिने सांगितले. प्रणाली आणि सुनील दोघे अंधेरीतील एका कंपनीत नोकरी करतात. त्यांचा २०११ साली प्रेमविवाह झाला होता.

21
First Published on: August 22, 2019 1:32 pm
Just Now!
X