ठाणे महापालिका स्थायी समिती सभापती आणि नऊ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षांची निवडणूक बिनविरोध झाली आहे. स्थायी समिती सभापतिपदाकरिता शिवसेनेतर्फे नरेश म्हस्के यांचा एकमेव अर्ज आला आहे.    नऊपैकी सात प्रभाग समित्या शिवसेना-भाजप युतीच्या तर तीन प्रभाग समित्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थायी समिती सभापती आणि दहा प्रभाग समितींच्या अध्यक्ष पदाकरिता मंगळवार, २८ एप्रिलला निवडणूक होणार आहे.  
माजीवाडा-मानपाडा प्रभाग समितीकरिता शिवसेनेच्या स्नेहा पाटील, वर्तकनगर प्रभाग समितीकरिता भाजपच्या आशादेवी शेरबहाद्दूर सिंग, लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समितीकरिता शिवसेनेच्या कांचन चिंदरकर, रायलादेवी प्रभागाकरिता अपक्ष आशा कांबळे, वागळे इस्टेट प्रभागाकरिता शिवसेनेच्या संध्या मोरे, उथळसर प्रभाग समितीकरिता शिवसेनेच्या महेश्वरी तरे, नौपाडा प्रभाग समितीकरिता शिवसेनेचे हिराकांत फर्डे, कोपरी प्रभागाकरिता राष्ट्रवादीचे भरत चव्हाण, कळवा प्रभागाकरिता राष्ट्रवादीच्या मनाली पाटील यांचा समावेश आहे. तसेच काँग्रेसच्या अन्सारी साजिया परवीन सरफराज आणि कुरेशी साजिया आई यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने मुंब्रा प्रभाग समितीकरिता निवडणूक होणार आहे.