वसई-विरार क्षेत्रातील रेल्वे स्थानके अजूनही प्रवाशांसाठी असुरक्षित; चेंगराचेंगरीचे संकट कायम

प्रभादेवी (एल्फिन्स्टन रोड) रेल्वे स्थानकीतल चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेला एक वर्ष उलटून गेल्यानंतरही रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी काहीच उपाययोजना केलेल्या नसल्याचे दिसून येत आहे. वसई रोड, नालासोपारा आणि विरार ही स्थानके विविध कारणांमुळे प्रवाशांसाठी धोकादायक बनलेली आहेत. अरुंद फलाट, बाहेर पडण्याचे निमुळते मार्ग, स्थानकातील अतिक्रमणे, अरुंद भुयारी मार्ग, दोन्ही फलाटांचे एकच मार्ग आणि नियोजनाच्या अभावी केलेली रचना यांमुळे या स्थानकांमध्ये चेंगराचेंगरी होऊन मोठी दुर्घटना होण्याची भीती आहे.

पूल धोकादायक

नालासोपारा

वाढत्या लोकसंख्येमुळे नालासोपारा रेल्वे स्थानक सर्वात जास्त गर्दीचे स्थानक झाले आहे. नालासोपारा पूर्व आणि पश्चिमेला बाहेर पडण्याचे मार्ग अरुंद झालेले आहेत. रेल्वेचे काम सुरू असल्यामुळे प्रवाशांना फलाटावर उभे राहण्यासाठी जागेची कमतरता भासत आहे. पूर्वेला स्थानकाबाहेर रिक्षाचे अतिक्रमण आहे. त्यामुळे प्रवाशांना बाहेर पडण्याचा मार्ग अपुरा ठरत असून त्यांची गैरसोय होत आहे. जुना लोखंडी पूलही जर्जर झालेला आहे. त्यामुळे दुर्घटनेची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाने जिन्याच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण केले नाही तर येणाऱ्या काळात चेंगराचेंगरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिन्यावर आणि पुलावर काही वेळी फेरीवालेही येऊन बसत असल्याने येण्याजाण्याच्या मार्गावर प्रवाशांची कोंडी होते. याबाबत बोलताना रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही  स्थानकाच्या असलेल्या अडचणी वरिष्ठांकडे पाठवल्या आहेत. रेल्वे प्रवाशांच्या दिवसेंदिवस वाढत असलेल्या संख्यांमुळे नवीन प्रकल्पांचे काम सुरू करण्यात आले आहे.

बाहेर पडण्याचे मार्ग अरुंद

वसई रोड

वसई रोड रेल्वे स्थानकात सात फलाटे आहेत. लांब पल्ल्याच्या गाडय़ा या स्थानकात थांबतात. नवा पूल रेल्वे प्रशासनाने बांधलेला आहे. मात्र फलाट क्रमांक १ जवळ चेंगराचेंगरीची शक्यता आहे. हा फलाट आनंदनगर येथे आहे. तेथून बाहेर पडण्याचा मार्ग निमुळता आणि छोटा आहे. या फलाटावर वसईहून सुटणाऱ्या लोकल लागतात. त्यामुळे मोठी गर्दी असते. रिक्षा पकडण्यासाठी प्रवासी या छोटय़ा मार्गावरून बाहेर पडतात. याच ठिकाणी दोन वर्षांपूर्वी गर्दी होऊन फलाटाबाहेरील नाल्यावर उभे असलेले प्रवासी खाली पडून दुर्घटना घडली होती. फलाट आणि बाहेर पडण्याचा मार्ग अपुरा असल्याने चेंगराचेंगरीची शक्यता आहे.

अतिक्रमणांचा विळखा

विरार

विरार रेल्वे स्थानकाची अवस्था बिकट झालेली आहे. विरार फलाट क्रमांक दोनवरून सुरू होणारा भुयारी मार्ग (सब वे) अरुंद आहे. मुळात फलाट क्रमांक दोनवरून बाहेर पडण्याचा आणि भुयारी मार्गात जाण्याचा मार्ग एक असल्याने या ठिकाणी प्रचंड गर्दी होते. त्यामुळे चेंगराचेंगरी होण्याची शक्यता आहे. विरार रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षाचालकांचे अतिक्रमण झालेले आहे. विरार स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही बाजूला रिक्षाचालकांनी अतिक्रमण केलेले आहे. पश्चिमेकडच्या रिक्षाथांब्यावरील रिक्षांचे अतिक्रमण तर थेट फलाटावरच होऊ  लागलेले आहे. पालघर-डहाणूला जाणारे प्रवासी फलाट क्रमांक दोन आणि तीनवरून फलाट सातवर जात असतात. त्यात रिक्षा उभ्या असतात. यामुळे तिथे मोठी गर्दी होत असते. भुयारी मार्गात विद्युत तारा अजूनही लटकत आहेत. त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन भुयारात आग लागण्याची शक्यता आहे. विरार फलाट क्रमांक एकवर काम सुरू असून बांधकाम साहित्य फलाटावर पडलेले आहे. त्यामुळे फलाटाची जागा कमी झाली असून ट्रेनच्या गर्दीमुळे त्या वेळी भयानक परिस्थिती उद्भवत असते.

फलाट ३, ४ चे जिने अरुंद

भाईंदर

मीरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीत पश्चिम रेल्वेवर भाईंदर आणि मीरा रोड ही दोन स्थानके आहेत. यापैकी भाईंदर रेल्वे स्थानकात सध्या तीन ठिकाणी पादचारी पूल बांधण्यात आले आहेत. हे सर्व पूल अलीकडच्या काळातच बांधण्यात आले असल्याने त्यांची स्थिती चांगली आहे. भाईंदर रेल्वे स्थानकात होणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन पूल चांगले रुंद करण्यात आले असल्याने पुलावर गर्दी अथवा चेंगराचेंगरी होण्याचे प्रकार होत नाहीत. परंतु फलाट क्रमांक ३ आणि ४ उतरणारे पुलाचे जिने तुलनेत फारच अरुंद असल्याने या ठिकाणी गर्दीच्या वेळी बऱ्याच वेळा आणीबाणीची परिस्थिती उद्भवत असते.

फलाट क्रमांक ३ आणि ४ एकत्रच आहेत. फलाट क्रमांक ३ वर भाईंदरहून सुटणाऱ्या लोकल येतात आणि फलाट क्रमांक ४ वर विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल येत असतात. त्यामुळे इतर फलाटांच्या तुलनेत या फलाटावर सर्वाधिक गर्दी होत असते. मुख्य पादचारी पूल रुंद असले तरी ३ आणि ४ क्रमांकाच्या फलाटावर उतरणारे जिने अरुंद आहेत. त्यामुळे सकाळी तसेच सायंकाळी गर्दीच्यावेळी ३ आणि ४ क्रमांकाच्या स्थानकात भाईंदर लोकल आणि विरारहून आलेली लोकल एकाच वेळी आली तर पुलावर जाण्यासाठीच्या अरुंद जिन्यावर एकच गर्दी होते. भाईंदर आणि विरारहून आलेल्या लोकलमधून उतरून जिन्यावर चढत असलेले प्रवासी तसेच लोकल पकडण्यासाठी जिना उतरत असलेले प्रवासी यांच्यात मोठय़ा प्रमाणावर खेचाखेच आणि धक्काबुक्की होत असते. त्यामुळे मुख्य पूल रुंद असले तरी फलाटावर उतरणारे जिने रुंद करणे आवश्यक असल्याची मागणी केली जात आहे.

फेरीवाल्यांचा अडथळा

मीरा रोड

मीरा रोड रेल्वे स्थानकात असलेले पूलही अलीकडेच नव्याने बांधण्यात आले आहेत. हे पूलही रुंद असले तरी सायंकाळच्या वेळी विरारच्या दिशेने असलेल्या पुलावर फेरीवाले बसत असल्याने प्रवाशांना मोठाच अडथळा निर्माण होत असतो. या पुलाला लागून स्कायवॉक बांधण्यात आलेला आहे. फेरीवाल्यांबाबत रेल्वे प्रशासनाकडे तक्रार आली की फेरीवाले स्कायवॉकवर पळून जातात. त्यामुळे त्यांच्यावर रेल्वेकडून कारवाई होत नाही. दुसरीकडे स्कायवॉकवरील फेरीवाल्यांवर महापालिकेकडून कारवाई करण्यासाठी पथक आले की हेच फेरीवाले रेल्वेच्या हद्दीतील पुलावर जाऊन बसतात. त्यामुळे फेरीवाल्यांवर ठोस कारवाई होत नाही, अशी प्रवाशांची तक्रार आहे.