गुरुपौर्णिमेची गर्दी, अरुंद रस्ते, खड्डे यांमुळे ठाण्यात प्रचंड वाहतूक कोंडी

ठाणे : गुरुपौर्णिमेनिमित्त टेंभीनाका येथील आनंद मठात उसळलेली शिवसैनिकांची गर्दी आणि शहरातील वेगवेगळ्या भागांतील रस्त्यावरील खड्डे यामुळे मंगळवारी सकाळपासूनच ठाणे शहराची वाहतूक मंदावली होती.  कळवा, कोर्टनाका, जेल मार्ग, साकेत रस्त्यावर सकाळपासूनच वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. घोडबंदर, कापूरबावडी, माजीवडा मार्गावरीही एकाच वेळी वाहनांचा भार वाढल्याने तेथेही कोंडी झाली.

कोपरी उड्डाण पुलावर सुरू असलेली कामे, मेट्रो प्रकल्पामुळे अरुंद झालेले रस्ते यामुळे गेल्या काही महिन्यांपासून महामार्ग तसेच घोडबंदर मार्गावर मोठी कोंडी होत आहे. जुन्या ठाणे शहरातील वाहनकोंडी कमी व्हावी यासाठी कोटय़वधी रुपयांचा खर्च करून तीन ठिकाणी उड्डाण पुलांची उभारणी करण्यात आली असली तरी अजूनही अरुंद रस्त्यामुळे या ठिकाणचा परिसर कोंडीमय होत असतो. असे असताना मंगळवारची सकाळ शहरातील वेगवेगळ्या भागांत एकाच वेळी मोठी कोंडी झाल्याने प्रवासीही चक्रावून गेले.

गुरुपौर्णिमेनिमित्त टेंभी नाका येथील आनंद मठात दर्शनासाठी सकाळपासूनच संपूर्ण जिल्ह्यातून शिवसैनिकांच्या मोठय़ा रांगा लागल्या होत्या. वाहनांमधून भरून मोठय़ा संख्येने शिवसैनिक, नेते, पदाधिकारी शहरात येत असल्याने नेहमीपेक्षा वाहनांची गर्दी अधिक होती. टेंभी नाका परिसरातील रस्ते आधीच निमुळते असून त्यात नेते मंडळींच्या वाहनांची भर पडली. त्यामुळे हा संपूर्ण परिसर काही तासांसाठी कोंडला. शहरात झालेल्या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका नवी मुंबई येथून बेलापूर मार्गे ठाण्यात येणाऱ्या वाहनचालकांना बसला.

दररोजच्या तुलनेत वाहनांची संख्या अधिक असल्याने वाहतूक कोंडी झाली होती असे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र, ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात असलेल्या चौकात मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले होते. हे खड्डे सोमवारी रात्री महापालिकेने बुजविले होते. मात्र, या डागडुजीनंतर खड्डय़ांभोवती अडथळे उभे केल्याने रस्ता अरुंद झाला. परिणामी कळवा, साकेत, सिडको येथून कोर्ट नाक्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची कोंडी झाली. दरम्यान, तलावपाळी, जांभळी नाका, माजीवडा, कापूरबावडी येथेही वाहतूक कोंडीचा परिणाम जाणवला. या मार्गावरून ठाणे रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्यांचे प्रचंड हाल झाले. अनेकांनी कोर्ट नाका येथून चालत जाण्याचा मार्ग पत्करला.

ट्रकमुळे वाट अडवली

घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या एका ट्रकचे चाक सकाळी अचानक फुटले. त्यामुळे हा ट्रक गायमुख येथे बंद पडल्याने घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी एकेरी मार्गिका सुरू करून वाहतूक सुरळीत केली. तसेच हा ट्रकही बाजूला केल्याची माहिती कासारवडवली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी दिली.