सनसिटी दफनभूमीचे बांधकाम पाडण्याचे राष्ट्रीय हरित लवादाचे आदेश

वसईच्या सनसिटी येथील सर्वधर्मीय दफनभूमीच्या जागेवरील काम हरित लवादाच्या निर्णयामुळे रखडल्याने आता पालिकेने शहरातील अन्यत्र दफनभूमी बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शहरातील १३ विविध ठिकाणी नवीन दफनभूमीसाठी जागा शोधल्या आहेत. सनसिटी येथील सर्वधर्मीय दफनभूमीची जागा सागरी नियंत्रण क्षेत्रात येत असल्याने हरित लवादाने कामास स्थगिती देऊन पालिकेने केलेले बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. राष्ट्रीय हरित लवादानेही हा निर्णय कायम ठेवून बांधकाम निष्कासित करण्याचे पालिकेला सांगितले आहे.

वसई पश्चिमेच्या सनसिटी येथील मौजे दिवाणमानमधील भूमापन क्रमांक १७६ व १७७ येथील अडीच एकर जागेवर महापालिकेतर्फे  सर्वधर्मीय दफनभूमी बांधण्यात येत आहे. आतापर्यंत या कामासाठी ११ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यात साडेचार गुंठे जागेवर भरणीसाठी साडेचार कोटी रुपये, ४० लाख रुपये सर्वेक्षणासाठी आणि भिंत बांधण्यासाठी हा खर्च आलेला आहे. या दफनभूमीला येथील स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. शिवसेनेचे नवघर माणिकपूर उपशहर अध्यक्ष सुनील मुळ्ये यांनी ही दफनभूमी किनारा नियंत्रण क्षेत्राअंतर्गत येत असल्याचे सांगून त्याविरोध हरित लवादाकडे तक्रार दाखल केली होती. त्यांच्या याचिकेवर सुनावणी होऊन लवादाने हे बांधकाम तोडण्याचे आणि जागा पूर्ववत करण्याचे आदेश दिले होते.

पालिकेने या आदेशाचा फेरविचार करण्यासाठी लवादाकडे पुन्हा अर्ज केला होता. लवादाने मात्र महापालिकेचा अर्ज फेटाळला आणि बांधकाम तोडण्याचे आदेश दिले. पालिकेने या निर्णयाविरोधात राष्ट्रीय हरित लवादाकडेही दाद मागितली होती.

राष्ट्रीय हरित लवादाच्या दिल्ली येथील मुख्यालयात या निर्णयावर सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आणि दोन तज्ज्ञ सदस्य असलेल्या त्रिस्तरीय खंडपीठापुढे ही सुनावणी झाली. पुण्यातील हरित लवादाने दिलेला निर्णय राष्ट्रीय हरित लवादाने कायम ठेवला. या जागेवर पालिकेने केलेले बांधकाम पाडण्याचे आदेश पालिकेला खंडपीठाने दिले आणि शहरात अन्यत्र नवीन जागा शोधण्याचे आदेश दिले. पालिकेने शहरातील १३ ठिकाणी पर्यायी जागा शोधून त्यावर विचार सुरू असल्याचे सांगितले.

सागरी किनारा क्षेत्राच्या अखत्यारीत ही जागा येत असल्याने नियमांचे उल्लंघन झाल्याचे हरित लवादाने म्हटले आहे. मात्र या ठिकाणी परवानगी मिळावी यासाठी यापूर्वीच पालिकेने केंद्रीय सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाकडे अर्ज केला आहे. त्यावरील निर्णय प्रलंबित आहे.

नागरिकांचा विरोध कायम

सनसिटी येथील दफनभूमीची जागा कायदेशीर प्रक्रियेत अडकल्याने पालिकेने शहरातील १३ पर्यायी जागेचा शोध घेतला असल्याची माहिती पालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी दिली. मात्र यातील काही जागा या सागरी किनारा क्षेत्र (सीआरझेड)मध्ये आहेत तर काही जागा या खडकाळ असून तेथे दफनभूमी करता येणार नाही. त्यामुळे या १३ जागांतील नियमांत बसणारी आणि सोयीस्कर जागा निवडण्याचा प्रयत्न असेल, असे आयुक्तांनी सांगितले. राष्ट्रीय हरित लवादाने येत्या १५ दिवसांत सनसिटी येथील जागेवर पालिकेने केलेले बांधकाम जमीनदोस्त करून जागा पूर्ववत करण्याचे आदेश पालिकेला दिले आहेत. त्यामुळे पालिकेला हे बांधकाम तोडावे लागणार आहे. याआधी दोन वेळा पालिकेने स्वत: केलेले बांधकाम पाडण्याची मोहीम हाती घेतली होती. मात्र दफनभूमीचे समर्थन करणाऱ्या नागरिकांनी विरोध केल्याने पालिका पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागले होते.