मुंबई विद्यापीठाचे यंदाचे निकाल हे नियोजित वेळेत लागणार नाहीत हे सावळ्या गोंधळामुळे आता स्पष्ट झाले आहे, याचा निषेध करण्यासाठी आज ठाण्यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने ‘तिरडी मोर्चा’ काढण्यात आला. यावेळी राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि कुलगुरू संजय देशमुख यांच्याविरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

मुंबई विद्यापीठाचे सर्व निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करावेत, असे स्पष्ट निर्देश कुलपती विद्यासागर राव यांनी कुलगुरुंना दिले असले, तरी या मुदतीत सर्व निकाल लागण्याची शक्यता नाही. वाणिज्य, कला आणि विधि विभागाचे निकाल आठवडाभर विलंबाने लागणार आहेत. विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांच्या परीक्षा होऊन दोन महिने उलटले आहेत. मात्र, जाणून बुजून निकाल लावण्यात आलेले नाहीत, यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. ५०० हुन अधिक विषयांपेक्षा केवळ १०० परीक्षांचेच निकाल लागले आहेत. याकडे राज्य सरकार आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांनी लक्ष न दिल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचा आरोप राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसने केला आहे.

मोर्चाच्या वेळी कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पुतळा दहन करण्याआधीच नौपाडा पोलिसांनी राष्ट्रवादीच्या २ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. पुतळा दहन न करता आल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि कुलगुरू संजय देशमुख यांच्याविरोधात घोषणाबाजी केरीत निषेध व्यक्त केला.