वसाहतीचे ठाणे सूरज कॉम्प्लेक्स,
डोंबिवली (पूर्व)
दोन-तीन दशकांपूर्वी डोंबिवली शहराची जडणघडण होत असताना उभारण्यात आलेल्या सोसायटय़ांपैकी एक म्हणजे सूरज कॉम्प्लेक्स..‘आम्ही आलो तेव्हा इथे काही नव्हते, हे सगळे आमच्या मागून आले’ अशी प्रातिनिधीक खंत अशा सोसायटीतील रहिवासी नेहमी व्यक्त करीत असतात. ‘सूरज’वासीही त्याला अपवाद नाहीत.
आजूबाजूला हिरवाईने नटलेला निसर्गरम्य परिसर, सकाळच्या शांत वातावरणात पक्ष्यांचा किलबिलाट, स्वच्छ मोकळी हवा.. अशा शांत सुंदर वातावरणात राहायला सर्वानाच आवडते. मात्र महानगरांमध्ये त्यातही डोंबिवलीसारख्या गर्दीच्या ठिकाणी अशी ठिकाणे सापडणे दुर्लभ आहे. मात्र अगदी काही वर्षांपूर्वी डोंबिवलीत असे सुंदर वातावरण होते. कमी किंमत आणि निसर्गरम्य वातावरण यामुळेच चाकरमानी मुंबईपासून दूर असूनही उपनगरांमध्ये स्थिरावले. पूर्व विभागातील सूरज कॉम्प्लेक्स हे गृहसंकुल साधारण त्याच काळात उभे राहिले. सुरुवातीला विरळ लोकवस्तीमुळे मुंबईतील रहिवाशांना येथे येऊन वास्तव्य करणे मनाला भावले. परंतु कालांतराने लोकवस्ती वाढली, आजूबाजूला उभ्या राहणाऱ्या उंच इमारतीमुळे मोकळी हवा मिळणेही आता दुरापास्त होऊन बसले आहे. अनेक जुने रहिवासी येथून घर विकून गेले आहेत तर काही आजही तेथे वास्तव्यास आहेत.डोंबिवली रेल्वे स्थानकापासून अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर सूरज कॉम्प्लेक्स असल्याने सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. १९८८-८९ मध्ये या संकुलातील इमारतींच्या बांधकामास सुरुवात झाली. १९९० मध्ये बांधकाम पूर्ण झाले. त्यानंतर १९९१ साली रहिवाशांना घरांचा ताबा देण्यात आला. त्या वेळी आजूबाजूला लोकवस्ती जास्त नसल्याने निसर्गरम्य परिसर, मोकळी हवा, लख्ख सूर्यप्रकाश, पक्ष्यांची किलबिल असे वातावरण होते. पुढे मात्र वस्ती जसजशी वाढत गेली, तसतसा येथील निसर्गाने काढता पाय घेतला. या वसाहतीत त्या वेळच्या इतर वसाहतींप्रमाणेच बहुतेक कनिष्ठ मध्यमवर्गीय आहेत. त्याचबरोबर येथे मुंबई पोर्ट ट्रस्टमधील कामगारवर्ग मोठय़ा प्रमाणात वास्तव्यास आला. या वसाहतीत आकृती, मारुती, जागृती अशा तीन इमारती असून त्यात प्रत्येकी दोन विंग आहेत. सर्व इमारती मिळून १२० कुटुंबे येथे गुण्यागोविंदाने आजच्या घडीला वावरत आहेत.

पार्किंगचा अभाव
१९९१ मध्ये घराचा ताबा मिळाल्यानंतर सुरुवातीला येथे फक्त दहा-बारा कुटुंबे राहायला आली. त्यानंतर हळूहळू नागरिक येत गेले. त्या वेळी आजूबाजूला मोठय़ा प्रमाणात वस्ती नव्हती. त्या वेळी ही सोसायटी म्हणजे डोंबिवलीचे शेवटचे टोक आहे असे वाटायचे. घरातून समोर नजर गेल्यास दिवा-मुंब्राचा डोंगर दिसायचा. मुंब्रा देवीचे  दर्शन घडायचे. त्या वेळी परिसर पाहून डोळ्याचे पारणे फिटायचे, अशा आठवणी अजूनही मूळ जुने रहिवासी अजूनही सांगतात. सोसायटीच्या आजूबाजूला सर्वत्र हिरवळ दाटलेली होती. काही गावकऱ्यांची येथे भाताची शेतीही होती. मुले आजूबाजूच्या मोकळ्या जागेत संध्याकाळी मस्त बागडायची, मोठी मुले फुटबॉल, हॉलीबॉल यांसारखे मैदानी खेळ खेळायची. वन रूम किचन असलेल्या छोटय़ाघरातही नागरिक चांगल्या वातावरणाने सुखावले होते. परंतु कालांतराने परिसराचा विकास होत गेला. आजूबाजूला लोकवस्ती मोठय़ा प्रमाणात वाढू लागली. आता या परिसरात दाटीवाटीने अनेक इमारती उभ्या राहिल्या आहेत. यामुळे रस्तेही अरुंद होत गेले, अचानक या परिसरात एखादी दुदैवी घटना घडल्यास अग्निशमन दलाच्या गाडीला जाण्यासही रस्ता अरुंद पडेल अशी परिस्थिती आहे. तसेच इमारतींना पार्किंग व्यवस्था नसल्याने वाहने कुठे ठेवायची हा मोठा प्रश्नच आहे. त्यामुळे नागरिकांना सध्या नाइलाजाने आपली वाहने रस्त्यावरच उभी करावी लागतात. त्यामुळे अर्थातच रस्ते वाहतुकीसही अडथळा निर्माण होतो. बाजूला झालेल्या उंच इमारतीमुळे सोसायटीच्या चार ते पाच मजली घरांमध्ये अंधार दाटू लागला आहे. मोकळी खेळती हवाही बंद झाली आहे. यामुळे जुन्या रहिवाशांनी घर बदलणे पसंत केले असल्याचे सांगितात.डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर दहा मिनिटांच्या अंतरावर असल्याने येथील रहिवाशांना पहिल्यापासून कोणत्याही सोयीसुविधांची अडचण कधी जाणवली नाही. स्टेशन परिसरात खाजगी शाळा, दवाखाने, भाजी मंडई, बँक अदी सोयीसुविधा उपलब्ध होत्या. पिठाची गिरणी, किराणा मालाचे दुकान, टेलिफोन बूथ यांसारख्या सर्व सोयीसुविधा सोसायटीच्या लगतच आहेत.डोंबिवली रेल्वे स्थानकाचा फायदा या सोसायटीला होताच, त्यात कोपर रेल्वे स्थानकाची भर पडली. कोपर रेल्वे स्थानक झाल्याने अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर रेल्वे स्टेशन आल्याने चाकरमानी वर्ग सुखावला. कोपर स्थानकामुळे मुंबईला जाण्या-येण्याचा तसेच डोंबिवली स्थानकातील गर्दीचा त्रास वाचल्याची भावना येथील नागरिक व्यक्त करतात.कोपर रेल्वे स्थानकामुळे आजूबाजूच्या परिसराचा विकास झपाटय़ाने होऊ लागला. दूरवर दिसणारा दिवा परिसर आता हाकेच्या अंतरावर आल्यासारखे वाटू लागले आहे. रेल्वेलगतच्या खाडी परिसरात भराव टाकून येथे मोठय़ा प्रमाणात चाळी उभ्या राहिल्या, तर अनेक टोलेजंग इमारतींचे प्रकल्पही येथे आले. येथील खोल्यांनाही चांगले भाव आल्याने या सोसायटीतील अनेक रहिवाशांनी येथील खोल्या खाली करून कोपर स्थानकालगतच्या मोठय़ा गृहसंकुलात जाणे पसंत केले आहे.येथील बरेचसे रहिवासी आपल्या खोल्या भाडय़ाने देऊन किंवा विकून येथून गेले असले तरी येथील जिव्हाळा मात्र कमी होत नाही. सोसायटीत दरवर्षी साजरे होणारे सण-उत्सव यांना जुने रहिवासी आवर्जून उपस्थित राहतात. वेगवेगळ्या जातीधर्माचे लोक येथे गुण्यागोविंदाने नांदतात. २६ जानेवारी, १५ ऑगस्ट, होळी, रंगपंचमी, दहीहंडी, दिवाळी, गणेशोत्सव, नवरात्र आदी सर्व सण साजरे केले जातात. सोसायटीच्या परिसरात प्रवेश करताच समोर  साईबाबाचे मंदिर आहे. सोसायटीत प्रवेश करणारा रहिवासी असो किंवा पाहुणा साईबाबांचे दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नाही.  दररोज संध्याकाळी तरुणवर्गाच्या हस्तेच साईबाबांची आरती केली जाते. तसेच जानेवारी महिन्यात शिर्डी येथे पायी पालखीही काढली जाते, यात सोसायटीतील सर्व रहिवासी सहभागी होतात.

पाण्याचे दुर्भिक्ष
अशा प्रकारे गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या या सोसायटीला प्राथमिक सोयीसुविधा उपलब्ध असल्या तरी सध्या एकच प्रश्न भेडसावत आहे तो म्हणजे पाण्याची टंचाई. याविषयी सोसायटीचे सचिव सुधाकर गावखडकर यांनी सांगितले- सध्या सगळीकडेच पाण्याची टंचाई जाणवत आहे. पाऊस कमी पडल्याने धरणांमध्येच पाणीसाठा कमी आहे. मात्र आमच्याकडे बारा महिने टंचाई आहे. सोसायटीत अतिशय कमी दाबाने आणि तेही फक्त एक तास पाणी येते. १२० कुटुंबांना ते पुरत नाही. काही सोसायटय़ांना कूपनलिकेचे पाणी असल्याने त्यांना पाण्याची टंचाई जाणवत नाही. आमच्या सोसायटीनेही बोअर घेतला होता, परंतु त्याला पाणी लागले नाही. पाण्याचा प्रश्न सुटला तर मग आम्हाला दुसरी कोणतीच अडचण नाही. रहिवासी येथे गुण्यागोविंदाने राहात असून दर महिन्याला आम्ही देखभाल खर्च जमा करतो. त्यातच इमारतीची देखभाल दुरुस्ती, डागडुजी आदी खर्च भागविला जातो असेही ते म्हणाले.