tvlogनवीन शैक्षणिक धोरणानुसार विज्ञानामधील विविध क्षेत्रांवर (ऊर्जा, पर्यावरण, पर्यावरणसंवर्धन, वन्यजीवन व्यवस्थापन इ.) लक्ष केंद्रित करण्यावर भर देण्यात आला आहे. सीईई (सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंट एज्युकेशन, अहमदाबाद) या संस्थेने या विविध क्षेत्रांचा परिचय विद्यार्थ्यांना करून देण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक काही पुस्तकांची निर्मिती केली आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांवर अतिरिक्त बोजा पडू नये म्हणून पाठय़पुस्तकांऐवजी कृतिशील सहभागाला प्राधान्य देणाऱ्या पुस्तकांची आखणी संस्थेने केली आहे. सीईई आणि सीईआरई (द सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंट रीसर्च अ‍ॅण्ड एज्युकेशन, मुंबई) या संस्थांच्या निवडक आणि वैशिष्टय़पूर्ण पुस्तकांचा संच ठाण्यातील पर्यावरण दक्षता मंच संस्थेने उपलब्ध केला आहे. विद्यार्थी आणि शिक्षक दोघांनाही मार्गदर्शक ठरतील, अशी ही पुस्तके आहेत आणि विज्ञान व पर्यावरण या क्षेत्रांचा माहितीपूर्ण परिचय होताना पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारण्याचे महत्त्वही कळणार आहे.
या संचातील प्रत्येक पुस्तकाची खरी ओळख ते प्रत्यक्ष वाचल्याशिवाय होणार नाही इतके ते माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण आहे. प्रत्येक पुस्तकामागील परिश्रम सातत्याने जाणवतात.
Joy of Learning  शीर्षकांतर्गत तीन पुस्तके आहेत (इ. ३ ते ५, इ. ६ ते ८, इ. ९ ते ११). पहिल्याच पुस्तकात जे छोटे-छोटे उपक्रम दिले आहेत ते मुलांना निसर्गाच्या जवळ घेऊन जातील आणि ते करीत असताना मुलांचे अनुभवविश्व समृद्ध होत जाईल. या तीनही पुस्तकांतील उपक्रम हे फक्त विज्ञान/ पर्यावरण शिक्षणापुरतेच मर्यादित नसून समाजशास्त्र, गणित, शारीरिक शिक्षण, हस्तकला, भाषा इ. विषयांचाही अभ्यास त्यातून होणार आहे, या दृष्टीने ठरवलेले आहे.
एनर्जी मॅटर्स : या पुस्तकात ऊर्जा विषयासंदर्भात ऊर्जा, ऊर्जेचे प्रकार, ऊर्जेचा वापर, पर्यावरणावरील त्याचे परिणाम, ऊर्जा बचत इ. मुद्दय़ांचा वेध घेण्याचा प्रयत्न दिसून येतो. शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून प्रयोग कशा प्रकारे करून घ्यावेत, याचे उत्तम मार्गदर्शनही यात आहे.
ग्रीन अ‍ॅक्शन गाइड : पर्यावरण शिक्षणाचे अंतिम ध्येय, पर्यावरणाची हानी थांबविणे, त्याचा दर्जा सुधारणे, जतन व संवर्धन हे आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यांना सहभागी करून कृतिशील कार्यक्रम/ योजना (घर, शाळा, सभोवतालचा परिसर) कसे राबविता येतील याचे मार्गदर्शन या पुस्तकात आहे.
ग्रीन गेम्स : निसर्गाविषयी संवेदनशीलता निर्माण व्हावी म्हणून कल्पकतेने तयार केलेल्या पर्यावरण शिक्षण देणाऱ्या २४ खेळांची सूची या पुस्तकात आहे. हे खेळ नावीन्यपूर्ण, मनोरंजनात्मक आणि बुद्धीला चालना देणारे आहेत.
वाइल्ड अ‍ॅट द झू : प्राणिसंग्रहालय हे केवळ सहलीचे ठिकाण नसून वन्यजीव संवर्धन आणि पर्यावरण शिक्षण देणारे अभ्यास केंद्र असते, हा दृष्टिकोन निर्माण करणारे पुस्तक आहे. या पुस्तकात पशू, पक्षी, त्यांचे विविध अवयव इ. विषयी विपुल माहिती आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी संग्रहालयाला भेट दिल्यावर स्वत:च्या निरीक्षणातून १० छोटय़ा प्रश्नावलीही आहेत.
गार्बेज टू गार्डन्स : घनकचरा व्यवस्थापन विषयांवर शाळांना विविध कृतिशील कार्यक्रम कसे राबविता येतील याचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करणारे हे पुस्तक आहे.
वॉटर : या छोटय़ाशा पुस्तकात पाण्याचे मूलभूत उपयोग, पाण्याचे गुणधर्म, पाण्याचे प्रदूषण या तीन मुद्दय़ांवर आधारित १२ छोटय़ा अ‍ॅक्टिव्हिटीज मुलांसाठी दिल्या आहेत.
अ‍ॅक्ट नाऊ : या संचातले अगदी छोटे पुस्तक, पण बहुधा वाचणाऱ्या प्रत्येकाला कृती करायला (आपल्या सवयी बदलायला) उद्युक्त करणारे आहे. मी काय करणार? मला कुठे वेळ असतो? सरकारची जबाबदारी आहे, असे म्हणणाऱ्या प्रत्येकाला छोटासा हातभार लावणे कसे शक्य आहे, असे पर्यायच दिले आहेत. (स्वयंपाक करताना, बागकाम करताना, वाहतूकविषयी, पाणी वापरताना, वीज बचत इ.)
पर्यावरण दक्षता मंच संस्थेतर्फे उपलब्ध या संचात अशा प्रकारची १८ पुस्तके, चार माहितीपूर्ण तक्ते, एक सेव्ह वॉटर किट, एक मॅजिक बकेट सीडी (कचऱ्यापासून खत तयार करणारी बादली आपण करू शकू), ‘आपलं पर्यावरण’ मासिकाचे अंक. असा हा संच म्हणजे विपुल माहितीचा खजिनाच आहे. प्रत्येक शाळेने आणि विद्यार्थ्यांने आपल्या संग्रही ठेवावा, असा हा संच आहे. ही पुस्तके जरी इंग्रजी भाषेत (ओझोनवरील एक तक्ता हिंदीत आहे) असली तरी अतिशय सोप्या आणि समजायला सुलभ जाईल अशा शैलीत लिहिली आहेत, हे आवर्जून नमूद करायला हवे. विज्ञान, पर्यावरण आणि पर्यावरणसंवर्धन, ऊर्जा इ. विषयांतील अनेक संकल्पना विद्यार्थ्यांना स्पष्ट होतील. उपक्रमांच्या माध्यमातून ते अधिकाधिक टप्प्याटप्प्याने शिकत जातील आणि हे विषय कंटाळवाणे वाटणार नाहीत, याची काळजी घेतलेली दिसून येते. भविष्याचा विचार करताना (सध्या आपल्याला ज्या समस्या भेडसावतात त्या दृष्टीने) तरुण पिढीवर पर्यावरण जतन, संवर्धनाचे संस्कार जडणघडणीच्या काळातच करणे ही निकड आहे.