ठाणे जिल्ह्य़ातील धरण, नैसर्गिक धबधबे, तलाव आणि पर्यटनस्थळांवर दुर्घटना घडून त्यात जीवितहानी होऊ नये यासाठी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी नुकतेच प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. त्यासाठी त्यांनी अधिसूचना काढली असून त्यानुसार ३१ जुलैपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत. पर्यटनस्थळांवर येणाऱ्या पर्यटकांनी काय काळजी घ्यावी आणि काय करू नये, अशा सूचना प्रतिबंधात्मक आदेशामध्ये देण्यात आल्या आहेत. या आदेशाचे पालन होते की नाही, याची पाहणी करण्यासाठी स्थानिक पोलीस गस्त घालणार असून यामुळे आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्य़ातील ठाणे, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर तालुक्यांतील पावसाळी पर्यटनासाठी धरण, खाडीकिनारा, धबधबे आणि तलाव आहेत. या ठिकाणी जिल्ह्य़ासह मुंबई, उपनगर आणि आसपासच्या जिल्ह्य़ांतून पर्यटक येत असतात. त्यामुळे अनेकदा अतिउत्साही पर्यटकांमुळे जीवितहानी होण्याची शक्यता असते. यापूर्वी अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. तसेच गेल्याच आठवडय़ात बदलापूरपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या कोंडेश्वर कुंडात बुडून एका २१ वर्षीत तरुणाचा मृत्यू झाला होता. या पर्यटनस्थळी धोक्याच्या सूचनेचा फलक लावण्यात येतो. तरीही त्या ठिकाणी पर्यटक मोठी गर्दी करीत असल्यामुळे दुर्घटना घडतात. अशा घटना रोखण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी पर्यटनस्थळांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी मंगळवारी काढली असून येत्या ३१ जुलैपर्यंत ही अधिसूचना लागू राहणार आहे.

बंदी कशावर?

*  पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात, खोल पाण्यात उतरणे आणि पोहणे, धबधब्याखाली जाणे किंवा त्याच्या पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे, ’ पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे या ठिकाणी सेल्फी काढण्यास,चित्रीकरणास मनाई.

*  पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास आणि मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करण्यास, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, बेकायदा मद्य विक्री आणि उघडय़ावर मद्यसेवन करणे यासाठीही बंदी घातली आहे.

*  सायंकाळी ६ ते सकाळी ६ या वेळेत धबधबे, तलाव, धरणे आणि पर्यटनस्थळे या ठिकाणी पाण्यात उतरण्यास बंदी घालण्यात आली आहे.

*  वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहन थांबविणे, बेदरकारपणे वाहन चालवू नये, अशा सूचनाही दिल्या आहेत.

*  सार्वजनिक ठिकाणी कचरा करणे, महिलांशी गैरवर्तन, असभ्य वर्तन, ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मनाई आदेश असलेली स्थळे

*    ठाणे तालुका – येऊर येथील धबधबे, सर्व तलाव, कळवा-मुंब्रा रेतीबंदर

*    कल्याण तालुका – कांबा, पावशेपाडा, खडवली नदी परिसर, टिटवाळा नदी परिसर, गणेश घाट, चौपाटी.

*    अंबरनाथ तालुका – कोंडेश्वर, धामणवाडी, तारवाडी, भोज, दहीवली, मळोचीवाडी.

*    मुरबाड तालुका – सिद्धगड, डोंगरन्हावे, सोनाळे, गणपती लेणी, पडाळे धरण, माळशेज घाटातील सर्व धबधबे, पळू, खोपवली, गोरखगड, सिंगापूर, नानेघाट, धसई धरण, आंबेटेंबे.

*    शहापूर तालुका – भातसा धरण, कुंडन, दहीगाव, माहुली किल्ल्याचा पायथा, घेरवली, अशोका धबधबा, खरोड, आजा पर्वत डोळखांब, सापगाव नदीकिनारा, कळंबे नदीकिनारा.

*    भिवंडी तालुका – गणेशपुरी नदी परिसर, नदी नाका.