मंडळांना उत्सवापुरती सवलत देण्याचा भाजपचा प्रस्ताव

मीरा-भाईंदर पालिकेचा परिसर स्वच्छ आणि सुंदर दिसावा यासाठी शहरात फलकबंदीची अंमलबजावणी सुरू होऊन अवघे पाच दिवस उलटत नाहीत तोच हा निर्णय नवरात्रोत्सव मंडळांसाठी शिथिल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फलकबंदीचा निर्णय घेण्यात पुढाकार घेणारा सत्ताधारी भारतीय जनता पक्षच मंडळांच्या मंडपांच्या आसपास ठरावीक अंतरापर्यंत फलक लावण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र महापालिका प्रशासनाने यावर आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही.

१ ऑक्टोबरपासून शहरात फलकबंदी लागू करण्यात आली आहे. महापालिकेने उभारलेले अधिकृत फलक वगळता इतरत्र फलक लावण्यास मनाई करण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहे. या निर्णयानंतर प्रशासनाने १ आणि २ ऑक्टोबर या दोन दिवशी मोठय़ा प्रमाणात स्वच्छता मोहीम राबवून शहरातील सर्व फलक काढून टाकले. परिणामी शहर सध्या स्वच्छ दिसू लागले आहे.

फलकबंदी व्हावी यासाठी सत्ताधारी भाजपनेच महासभेत प्रस्ताव आणला होता, तसेच शहराचे विद्रूपीकरण करणारे फलक उतरविण्यासाठी प्रशासनासह भाजपचे नेतेदेखील सरसावले होते. आता याच भाजपने नवरात्रोत्सव मंडळांना फलकबंदीतून सूट देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

राजकीय व्यक्ती, व्यावसायिक यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या देणग्यांवरच गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांचे आर्थिक गणित अवलंबून असते. मंडळे देणग्या देणाऱ्या व्यक्तींचे फलक मंडपात व मंडपाबाहेर लावून त्यांना मोठी प्रसिद्धी देतात. राजकीय व्यक्तींना देखील या उत्सवातून मिरवण्याची संधी मिळते. त्यामुळे ते देणगीच्या स्वरूपात आपला खिसा रिकामा करण्यात तयार असतात. ज्या व्यक्तीची देणगी जास्त त्याचा फलक मोठा अशी सर्वसाधारण पद्धत असते. फलकबंदीचा निर्णय गणेशोत्सवानंतर लागू झाल्याने गणेशोत्सव निर्विघ्न पार पडला.

१ ऑक्टोबरपासून लागू करण्यात आलेल्या फलकबंदीचा नवरात्रोत्सव मंडळांना फटका बसण्याची शक्यता आहे. यात राजकीय व्यक्तींचे देखील नुकसान होत असल्याने नवरात्रोत्सवादरम्यानच्या काळात फलकबंदीतून सूट देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.  मंडळांसाठी हा निर्णय मागे कसा घ्यायचा, या पेचात प्रशासन आहे. नवरात्र मंडळेदेखील संभ्रमात आहेत. परवानगी मिळाली नाही तर देणग्या देणारे हात आखडता घेतील, अशी भीती या मंडळांना सतावत आहे.

मंडपाबाहेर ठरावीक मर्यादेपर्यंत एकाच आकाराचे फलक लावण्यास परवानगी देण्यात यावी आणि ही परवानगी केवळ उत्सवापुरतीच असावी, असा प्रस्ताव प्रशासनाकडे देण्यात आला आहे.

– ध्रुवकिशोर पाटील, माजी सभापती, स्थायी समिती