लहानगा प्रकल्प उभारण्याची महापालिकेची तयारी

नवी मुंबईतील दिघा येथे उभारण्यात आलेल्या रेल्वेच्या धरणामधील पाण्यावर हक्क सांगत नवी मुंबईतील राजकीय नेते आणि प्रशासनाची झोप उडवून देणाऱ्या ठाणे महापालिकेने आता हे धरण कायमस्वरूपी पदरात पाडून घेण्याच्या जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. तब्बल दीडशे वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले हे धरण अगदी काल-परवापर्यंत कुणाच्या लेखीही नव्हते. यंदा दुष्काळाच्या झळा जाणवू लागताच जेमतेम पाच दशलक्ष लिटर इतक्या क्षमतेच्या असलेल्या या धरणाच्या पाण्यासाठी ठाणे आणि नवी मुंबईत जणू स्पर्धाच लागली आहे. असे असताना हे धरण ठाणे महापालिकेस कायमस्वरूपी हस्तांतरित केले जावे, अशा स्वरूपाचा प्रस्ताव ठाण्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी तयार केला असून मंगळवारी रेल्वे महाव्यवस्थापकांसोबत होणाऱ्या संयुक्त बैठकीत त्यावर चर्चा केली जाणार आहे.

दिघा येथील इलठण पाडा परिसरात ब्रिटिशांनी सुमारे १५० वर्षांपूर्वी डोंगरात दगडी बंधारा बांधून हे धरण बांधले. पुरेशा देखभाल दुरुस्तीअभावी या ब्रिटिशकालीन धरणांच्या भिंतीमधून आता पाणी पाझरत आहे. रेल्वेच्या लेखी यास धरण संबोधले जात असले तरी हा एक प्रकारचा मोठा बंधारा आहे. जेमतेम चार ते पाच दशलक्ष लिटर क्षमतेच्या या बंधाऱ्यातून २५ ते ५० हजार रहिवाशांच्या पाण्याची सोय करता येऊ शकते. यंदा तर या धरणात पाण्याचा अतिशय कमी साठा आहे. ऐरोली, दिघा तसेच आसपासच्या झोपडपट्टी परिसरास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून पाण्याचा पुरवठा होत असतो. राज्य सरकारने औद्योगिक विकास महामंडळावर तब्बल ५५ टक्क्यांची पाणीकपात लागू केल्याने या परिसरास त्याचा फटका बसला आहे. त्यामुळे दिघा धरणातील पाणी धुणी-भांडी तसेच इतर वापरासाठी उचलण्याची परवानगी नवी मुंबई महापालिकेने मागितली होती. त्यावर आता ठाण्यानेही हक्क सांगितल्याने आधीच तळाशी आलेल्या या धरणातील पाणी उचलण्यावरून या दोन्ही महापालिका आमनेसामने आल्या आहेत. पारसिक डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या धरणातून पाणी उचलणे ठाणे महापालिकेस फारसे सोयीचे नाही.

रेल्वेपुढे प्रस्ताव मांडणार

दिघा धरणाची मालकी रेल्वेकडे असली तरी या ठिकाणी भागीदारीत एखादा वीजनिर्मिती अथवा लहानगा पाणीपुरवठा प्रक्रिया प्रकल्प उभारता येऊ शकतो का यासंबंधीचा प्रस्ताव रेल्वेपुढे मांडला जाणार आहे, अशी माहिती ठाणे महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. हे धरण भौगोलिकदृष्टय़ा ठाणे आणि नवी मुंबईच्या वेशीवर आहे. या ठिकाणी एखादा प्रकल्प उभा केला गेल्यास तसेच धरणाच्या बंधाऱ्याची दुरुस्ती केली गेल्याने येथील पाणी सातत्याने वापरात आणले जाऊ शकते, असा दावाही वरिष्ठ सूत्रांनी केला. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक पुढील आठवडय़ात या धरणाला भेट देत आहेत. या पाहणीनंतर त्यांच्यापुढे यासंबंधीचा प्रस्ताव मांडला जाईल, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.