कुत्र्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या एका विकृताला नेरुळ रेल्वे स्टेशन कॉम्पलेक्स परिसरातून अटक करण्यात आली आहे. स्टेशन कॉम्पलेक्स परिसरात असणाऱ्या CCTV फुटेजमधून हा प्रकार समोर आला. त्यानंतर प्राणी हक्कासाठी लढणारे कार्यकर्ते या प्रकाराच्या चौकशीची मागणी करत होते. कुत्र्यावरील लैंगिक शोषणाची ही दुसरी घटना आहे. याआधी पवई परिसरातील गॅलरीया मॉल भागात एका कुत्र्याचे लैंगिक शोषण करण्यात आले होते.

या प्रकरणातील आरोपीलाही रविवारी पोलिसांनी अटक केली. आठवडयाभरापूर्वी नेरुळ पश्चिमेला स्टेशनजवळ एका व्यक्ती कुत्र्याचे लैंगिक शोषण करत असल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. ‘हा व्हिडीओ पीएफए मुंबई युनिट दोनला मिळाला होता’ असे पीएफए कार्यकर्ते विजय रंगारे यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले. “मी आणि माझा सहकारी आदित्य पाटील घटनास्थळी गेलो व मुक्या प्राण्यावर क्रूर पद्धतीने अत्याचार करणाऱ्याचा शोध सुरु केला. आम्ही त्या संशियाताला शोधून काढले. ते दैनंदिन मजुरीवर काम करायचा व रात्री स्टेशन परिसरात झोपायचा” असे विजय रंगारे यांनी सांगितले.

“आम्ही आणि पोलीस त्याला पकडण्यासाठी गेलो, त्यावेळी तो तिथे सापडला नाही. पण रविवारी दुपारी मला स्थानिक रहिवाशाचा फोन आला. त्याने संशयित त्या भागात असल्याचे सांगितले. त्यानंतर आमची पीएफएची टीम आणि पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले व आरोपीला अटक केली” अशी माहिती रंगारे यांनी दिली. आरोपी विरोधात आयपीसीच्या कलम ३७७ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.