ठाणे : नवी मुंबई येथील एका खासगी शाळेत सातवीत शिकणाऱ्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शाळेतील शिक्षक अवधबिहारी शुक्ला (३४) याला मंगळवारी ठाणे न्यायालयाने दोषी ठरवत १० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

नेरूळ परिसरातील एका खासगी शाळेत सातवीमध्ये शिकणाऱ्या १३ वर्षीय मुलीवर शुक्ला याने एप्रिल आणि ऑगस्ट २०१६ मध्ये लैंगिक अत्याचार केले होते. घडलेल्या प्रकाराबाबत पालकांना सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकीही शुक्लाने दिली होती. दरम्यान, मुलीच्या पोटात दुखू लागल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही मुलगी गर्भवती असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. यानंतर, पिडीत मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार नेरूळ पोलिसांनी शुक्ला याला अटक केली. या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.बी. बहालकर यांच्या न्यायालयात झाली.  यावेळी सरकारी वकील वर्षां चंदने यांनी केलेला युक्तीवाद, सादर केलेले पुरावे आणि पिडीत मुलीसह १८ साक्षीदारांची साक्ष ग्राह्य़ धरण्यात आली. याप्रकरणात शुक्लाला १० वर्ष कारावासाची शिक्षा आणि ५० हजार रुपये दंड सुनावण्यात आला आहे. याप्रकरणी तपास अधिकारी म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांनी तर, न्यायालय अंमलदार म्हणून प्रभाकर महाजन यांनी काम पाहिले.